पंचेचाळीस मतदान केंद्र संवेदनशील
By admin | Published: February 21, 2017 02:25 AM2017-02-21T02:25:49+5:302017-02-21T02:25:49+5:30
मतदानासाठी ‘क’ प्रभाग निवडणूक कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ९, १०, २० मध्ये एकूण १७४ मतदान केंद्र असून
नेहरुनगर : मतदानासाठी ‘क’ प्रभाग निवडणूक कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ९, १०, २० मध्ये एकूण १७४ मतदान केंद्र असून, यांपैकी ४५ मतदान केंद्र संवेदनशील असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सोनाप्पा यमगर यांनी दिली.
प्रभाग क्रमांक ९ मध्ये ६४ मतदान केंद्र आहेत. प्रभाग क्रमांक १० मध्ये ५६ आहे. तर २० मध्ये ५४ मतदान केंद्र असून, तिन्ही प्रभागांत एकूण १७४ मतदान केंद्र असून यापैकी ४५ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मतदानासाठी क प्रभाग निवडणूक कार्यालयातून कर्मचाऱ्यांना कंट्रोल युनिट, बॅलेट मशिन, चिन्हांकित यादी, मतदारयादी नोंदवही, केंद्राचा शिक्का, बूथ साहित्य, पितळी मोहर आदी प्रकारचे निवडणूक साहित्य वाटप करण्यात आले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सोनाप्पा यमगर यांनी दिली. मतदान यंत्राविषयी तांत्रिक प्रक्रिया, मतदान मशिन, बोगस मतदार कसे ओळखायचे, एखाद्या मतदाराने तीनच उमेदवारांना मतदान केल्यास पुढे काय करायचे, अंध-अपंग यांचे मतदान कसे करायचे, बूथ कॅप्चरिंग झाल्यावर काय उपाययोजना करायच्या या विषयी यमगर यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
या वेळी मोठ्या संख्येने निवडणूक कर्मचारी उपस्थित होते. निवडणुकीसाठी कोणत्या बूथ कोणत्या मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त आहे. हे पाहण्याकरिता पोलीस कर्मचाऱ्यांनादेखील निवडणूक कार्यालयात सकाळपासून मोठी गर्दी केली होती.या वेळी एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे, दिलीप शिंदे यांनी निवडणूक कार्यालयात भेट देऊन पोलीस बंदोबस्ताची पाहणी केली. निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर सोडण्यासाठी पीएमपी बस व्यवस्था करण्यात आली असल्यामुळे निवडणूक कार्यालयाबाहेर सकाळी पीएमपी बस रांगा लागल्या होत्या. (वार्ताहर)