बोपखेलला होणार पाँटॉन पूल
By admin | Published: May 31, 2016 02:02 AM2016-05-31T02:02:46+5:302016-05-31T02:02:46+5:30
बोपखेल येथील मुळा नदीवर उभारण्यात आलेला तात्पुरता तरंगता पूल ७ जूनला काढण्यात येणार आहे. त्यामुळे बोपखेल ग्रामस्थांसाठी पर्यायी रस्ता देण्यासंदर्भात सोमवारी लष्कराच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा झाली.
पिंपरी : बोपखेल येथील मुळा नदीवर उभारण्यात आलेला तात्पुरता तरंगता पूल ७ जूनला काढण्यात येणार आहे. त्यामुळे बोपखेल ग्रामस्थांसाठी पर्यायी रस्ता देण्यासंदर्भात सोमवारी लष्कराच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा झाली. त्यानुसार सध्या असलेल्या पुलाच्या शेजारीच ‘पाँटॉन पूल’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, त्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे हा पूल तयार होईपर्यंत सध्या असलेला पूल काढण्यात येऊ नये, अशी मागणी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे मंगळवारी होणाऱ्या बैठकीत केली जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
दापोडी येथील कॉलेज आॅफ मिलिटरी इंजिनिअरिंगच्या (सीएमई) हद्दीतून जाणारा रस्ता वापरासाठी गेल्या वर्षी बंद करण्यात आला आहे. त्यानंतर लष्कर आणि स्थानिक प्रशासनामध्ये झालेल्या चर्चेत मुळा नदीवर तात्पुरता तरंगता पूल उभारण्याचा निर्णय झाला. त्यानुसार लष्कराने मुळा नदीवर हा पूल उभारून बोपखेल ग्रामस्थांना रस्ता उपलब्ध करून दिला आहे. परंतु, पावसाळ्यात हा पूल धोकादायक ठरणार असल्यामुळे लष्कराने ७ जूनपूर्वी तो काढण्याचा निर्णय घेतला आहे.
त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवारी महापालिकेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला महापौर शकुंतला धराडे, खासदार अमर साबळे, आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हाधिकारी सौरभ राव, आयुक्त दिनेश वाघमारे, स्थायी समिती सभापती डब्बू आसवानी, नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, नगरसेवक संजय काटे, लष्कर, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले, लष्कर पूल ७ जूनपूर्वी कोणत्याही परिस्थितीत हटविणार आहेत. सीएमईतून जाणारा पूर्वीचा रस्ता खुला करण्यास नकार दिला. कुंभमेळ्यात गंगा नदीवर उभारण्यात येणाऱ्या पाँटॉन पुलाप्रमाणे पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)