पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा; कर भरल्याने कंपनीचा लिलाव टळला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 09:59 PM2024-08-13T21:59:16+5:302024-08-13T22:01:54+5:30
पूजा खेडकर यांच्या अटकेबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आता त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे.
ज्ञानेश्वर भंडारे
पिंपरी : बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या तळवडेतील कंपनीने थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टीचा भरणा केला आहे. त्यामुळे कंपनीचा लिलाव टळला. दोन लाख ८७ हजारांचा मालमत्ता कर आणि एक लाख ७८ हजार रुपयांची पाणीपट्टी भरली आहे.
पूजा खेडकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातून अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी रहिवासी पुरावा म्हणून तळवडेतील कंपनीचा पत्ता दिला होता. प्रमाणपत्रासाठी रेशन कार्ड ओळखपत्र म्हणून दिले होते. या रेशन कार्डवरही याच कंपनीचा पत्ता होता. तळवडे गावठाण, ज्योतिबानगर येथे असलेली थर्मोव्हेरिटा प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पूजा यांच्या आई मनोरमा यांच्या नावावर आहे. कंपनीकडे सन २०२२ पासून दोन लाख ८७ हजारांचा मालमत्ता कर थकीत होता.
नोटिसीनंतरही कर न भरल्याने १९ जुलै रोजी मालमत्ता जप्त केली होती. त्यानंतर कराचा भरणा करण्यास २१ दिवसांची मुदत होती. या कालावधीत कर भरला नसता तर कंपनीचा लिलाव केला जाणार होता; परंतु खेडकर कुटुंबीयांनी सहा ऑगस्ट रोजी दोन लाख ८७ हजार ५९१ रुपयांची मालमत्ताकराची थकबाकी भरली आहे. त्याचबरोबर एक लाख ७८ हजार ६८० रुपयांची पाणीपट्टीही भरली आहे. त्यामुळे कंपनीवरील लिलावाची टांगती तलवार टळली आहे.