Positive Story: पिंपरीत गृहविलगीकरणात उपचार घेऊन १ लाख ६६ हजार रुग्णांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 01:50 PM2021-05-03T13:50:39+5:302021-05-03T13:50:45+5:30
सक्रिय रुग्णसंख्येच्या तुलनेत जवळपास ८० टक्के रुग्ण हे गृहविलगीकरणात
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात आतापर्यँत २ लाख १५ हजार ३९३ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १लाख ९० हजार ४२१ रुग्ण हे कोरोनातून बरे झाले आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे १ लाख ६६ हजार ६७९ जण हे गृहविलगीकरणात उपचार घेऊन बरे झाले आहेत. अशी माहिती महापालिकेच्या वॉर रूमने दिली.
ज्या रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. इतर कोणताही आजार नाही. अशा रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवले जाते. सद्यस्थितीत शहरात १३ हजार ९८४ रुग्ण हे त्यामध्ये उपचार घेत आहेत. सक्रिय रुग्ण संख्येच्या तुलनेत जवळपास ८० टक्के रुग्णांनी हा पर्याय निवडला आहे. सुरुवातीच्या काळात या पर्यायाने उपचार घेण्याबाबत नागरिकांमध्ये भीती होती. परंतु आता नागरिक स्वतःहून गृहविलगीकरणाचा पर्याय स्वीकारत असल्याचे दिसून येत आहे. या रुग्णांना जरी सौम्य लक्षणे असली तरी त्यांच्या पासून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा रुग्णांनी काळजी घेणे आवश्यक आहे. अशा रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि रुग्णाला तात्काळ वैद्यकीय मदत मिळवी यासाठी महापालिकेने कोविड कॉल सेंटर सुरू केले आहे.
रुग्ण अति गंभीर होण्याआधी उपचार व्हावेत. रुग्णाच्या घरातील इतर व्यक्तींना वैद्यकीय सल्ला उपलब्ध करून देणे. रुग्णांना वैद्यकीय आणि मानसिक आधार देणे यासाठी हे कॉल सेंटर सुरू केले आहे. या माध्यमातून रुग्णांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली जाते. यामध्ये कोणती लक्षणे आहेत. ताप, सर्दी, खोकला याची माहिती घेतली जाते. रुग्णाला काही शंका असल्यास फोन डॉक्टरांना जोडून दिला जातो. यासाठी दहा डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासनाकडून दररोज कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची माहिती कॉल सेंटरला दिली जाते.
गृहविलगीकरणात असणाऱ्यांनी ही काळजी घ्यावी
- घरी व्यवस्था असेल तरच पर्याय स्वीकारावा.
- कोणाच्याही संपर्कात येवू नका.
- रोज नियमितपणे ऑक्सिजन पातळी तपासा आणि नोंद करून ठेवा.
- मास्क, टीशु पेपर, वापरलेले साहित्य वेगळ्या बॅगमध्ये ठेवा इतरत्र फेकू नका.
- सहा मिनिटांची वॉक टेस्ट करा.
- उपचार करत असलेल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहा.
- कोणताही त्रास असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालय किंवा कोविड केअर सेंटर मध्ये दाखल व्हा.
२ मे पर्यँतची आकडेवारी
आज पर्यँतचे एकूण रुग्ण: २ लाख १५ हजार ३९३
बरे झालेले: १ लाख ९० हजार ४२१
गृहविलगीकरणात बरे झालेले: १ लाख ६६ हजार ६७९
मृत्यू : ३ हजार ३३
हद्दी बाहेरील मृत्यू : १ हजार ५२१
सध्या सक्रिय रुग्ण : २१ हजार ९३८
रुग्णालयात आणि सीसीसी सेंटर मध्ये उपचार घेत असलेले: ७ हजार ९५४
गृहविलगीकरणात असलेले: १३ हजार ९८४