रेशन वाटपाच्या पॉस मशिन कुचकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 02:07 AM2018-03-28T02:07:31+5:302018-03-28T02:07:31+5:30
रास्त भाव दुकानातून अन्नधान्य वितरणात सुसूत्रता येण्यासाठी दुकानदारांना पॉस मशिनचे
पिंपरी : रास्त भाव दुकानातून अन्नधान्य वितरणात सुसूत्रता येण्यासाठी दुकानदारांना पॉस मशिनचे वाटप करण्यात आले. शिधापत्रिकाधारकांचे बोटाचे ठसे घेऊन व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांना धान्यवाटप केले जात आहे. मात्र, काहींचे बोटांचे ठसे उमटविण्यास अडचणी येऊ लागल्याने पॉस मशिन कुचकामी ठरू लागली आहेत. गरीब, गरजू स्वस्त धान्य मिळण्याच्या लाभापासून वंचित राहू नयेत, या दृष्टीने सुधारणा करण्याची मागणी होऊ लागली आहे.
अन्नधान्य वितरणातील भ्रष्टाचार कमी करून पारदर्शकता वाढविण्यासाठी पॉस मशिन आॅनलाइन पद्धतीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ज्या वेळी नागरिक आपल्या बोटांचे ठसे मशिनवर उमटवितात, त्या वेळी त्यांच्या नावे मशिनमधून पावती निघते. त्यानंतर शिधापत्रिका धारकाला धान्य दिले जाते. पॉस मशिनला जोडणारे सर्व्हर
कायम डाऊन असतात. त्यामुळे पॉस मशिन उपयोगात येत नाही, अशी शिधापत्रिकाधारकांच्या तक्रारी आहेत.
जोपर्यंत पॉस यंत्रणेची जोडणी योग्य प्र्रकारे होत नाही, तोपर्यंत शिधापत्रिका, तसेच आधारकार्ड तपासून गोर-गरिबांना धान्य देण्याची सोय करावी. नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टीतर्फे राजेश नागोसे यांनी अन्नधान्य वितरण विभागाला दिले आहे. या वेळी राजेश नागोसे, मधुकर भिसे, बबन गायकवाड, सोनाली गजभारे व संगीता बल्लाळे आदी उपस्थित होते.