‘पॉस’ मशिनने धान्यवाटपाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 12:53 AM2018-10-06T00:53:24+5:302018-10-06T00:53:47+5:30
रेशनिंग दुकान : शहरात १८२ मशिनद्वारे वितरकांना पुरवठा
पिंपरी : निगडीतील परिमंडळ कार्यालयांतर्गत येणाऱ्या ‘अ’ आणि ‘ज’ या दोन विभागात १८२ ‘ई-पॉस’ मशीनद्वारे धान्यवाटप केले जाते़ यामुळे सर्व धान्यवाटपाचे ‘रेकॉर्ड’ राहत असून, त्यानुसार दुकानदारांना मोजकेच धान्य पुरविले जात आहे. ‘अ’ विभागात ९८ मशीन असून, ३० हजार ८६२ शिधापत्रिकाधारक आहेत. तर ‘ज’ विभागात ८४ मशीन असून, २९ हजार ३०७ शिधापत्रिकाधारक आहेत. रेशनिंग दुकानांमधून यापूर्वी शिधापत्रिकेवरच धान्य दिले जायचे. आता ‘पॉस’ मशिनद्वारे वाटप होत आहे. यासाठी दुकानदारांना पॉस मशीन देण्यात आले आहे.
या मशीनमुळे धान्य वाटपातील काळाबाजार थांबण्यास मदत होत आहे. दरम्यान, पॉस मशीनसाठी प्रत्येक दुकानदाराकडून शिधापत्रिकाधारकांच्या आधार क्रमांक जोडणीसह संदर्भ रजिस्टर कार्यालयात जमा झाले आहेत. त्यानुसार कार्यालयाकडून दुकानदारांना धान्य पुरविले जात आहे. शिधापत्रिकाधारकाची संपूर्ण माहिती, युनिट संख्या, आधार क्रमांक, धान्य वितरणाचे प्रमाण आदी माहिती यामध्ये आहे. यापूर्वी आधार नसलेले धान्य घेऊन जात होते. आता त्यास आळा बसत आहे. जितके धान्य दिले, तेवढ्या रकमेची स्लिप बाहेर येणार आहे. शिधापत्रिकाधारकांची सर्व माहिती पॉस मशीनमध्ये संकलित आहे. दुकानदाराने धान्य दिल्यानंतर लगेचच त्याची पावतीदेखील मिळत आहे. या शिधापत्रिकेतील माहितीचेदेखील संगणकीकरण करण्यात आले आहे.
पूर्वी रास्त भाव धान्य दुकानांत शिधापत्रिकेवर धान्यवाटप केले जात होते. यामुळे अनेकदा इतर व्यक्तीने धान्य नेण्याचे प्रकार घडत होते. मात्र, आता पॉस मशीनवरील माहिती जुळली, तरच धान्य दिले जाते.
पारदर्शक, पेपरलेस कारभाराने भ्रष्टाचाराला आळा
शिधापत्रिकाधारकांच्या माहितीचे संगणकीकरण झाल्याने नवीन नाव टाकणे, कमी करणे, बदल करणे अशा प्रकारचे कामकाज तातडीने होण्यास मदत होत आहे. तसेच पेपरलेस कारभार होण्यासही हातभार लागत आहे. आॅनलाइन कामकाज करण्यासाठी या माहितीचे संगणकीकरण फायदेशीर ठरणार आहे.