शहरातील समस्या निराकरणासाठी ‘पोस्ट अ वेस्ट’ सुविधा उपलब्ध; नागरिकांसाठी नवी संकल्पना
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: October 13, 2023 05:46 PM2023-10-13T17:46:19+5:302023-10-13T17:49:05+5:30
सर्व नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपली तक्रार नोंदवावी व समस्या निराकरण करण्यासाठी याचा वापर करावा
पिंपरी : शहरांमध्ये कोठेही झाडांच्या फांद्या तोडून ठेवल्या असतील, काढलेले गवत, हिरवा कचरा, बांधकामाचा राडारोडा, हॉटेल, खानावळ, मंगल कार्यालय यांचे शिल्लक अन्न, खरकटे. तसेच इलेक्ट्रॉनिक कचरा अश्या चार प्रकारातील कचरा उचलणे व त्याबाबत तक्रारी करण्यासाठी ऑनलाईन स्मार्ट सारथी ॲपमध्ये ‘पोस्ट अ वेस्ट’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने आज नागरिकांसाठी ‘ पोस्ट अ वेस्ट ’ नावाची संकल्पना सादरीकरण करून नागरिकांसाठी उपलब्ध केलेली आहे, महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळावर किंवा महापालिकेच्या सारथी मोबाईल अँपद्वारे योजनेचा लाभ नागरिक घेऊ शकतात.
कशासाठी ‘पोस्ट अ वेस्ट’
नागरिकांना शहरांमध्ये कोठेही झाडांच्या फांद्या तोडून ठेवल्या असतील, काढलेले गवत, हिरवा कचरा, बांधकामाचा राडारोडा, हॉटेल, खानावळ, मंगल कार्यालय यांचे शिल्लक अन्न, खरकटे. तसेच इलेक्ट्रॉनिक कचरा अश्या चार प्रकारातील कचरा उचलणे व त्याबाबत तक्रारी करण्यासाठी ऑनलाईन स्मार्ट सारथी ॲप मध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तक्रार ही महानगरपालिकेने नेमून दिलेल्या एजन्सीकडे नोंद होऊन त्वरित निपटारा करण्यासंबंधी कारवाई केली जाणार आहे.
अशी करा तक्रार...
नागरिकांनी तक्रारी मधील असुविधेचा फोटो या ॲप्लीकेशन मध्ये अपलोड करून आपली तक्रार नोंदवायची आहे. या तक्रारीचा क्रमांक नागरिकांना त्वरित ऑनलाईन पद्धतीने दिला जाणार आहे. तसेच एजन्सीकडून तक्रारीचा निपटारा करून ऑनलाइन पद्धतीने त्याची नोंद घेतली जाणार आहे. जेणेकरून नागरिकास तक्रार निवारणाबाबत त्वरित माहिती उपलब्ध होईल, तसेच त्या जागेचा फोटो ॲप्लीकेशन मध्ये अपलोड करण्यात येणार आहे.
''या स्मार्ट सारथी अँपमध्ये निर्माण करून दिलेल्या सुविधेमुळे नागरिकांच्या तक्रारी कमी होऊन वेळेत निपटारा होण्यास मदत होणार आहे. आरोग्य विभाग, पर्यावरण विभाग, उद्यान विभाग यांच्याकडून माहिती घेऊन एप्लीकेशन तयार करण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपली तक्रार नोंदवावी व समस्या निराकरण करण्यासाठी याचा वापर करावा.- शेखर सिंह, आयुक्त महापालिका''