कलाशिक्षकांचे पद धोक्यात
By admin | Published: May 10, 2017 04:00 AM2017-05-10T04:00:06+5:302017-05-10T04:00:06+5:30
विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात कला विषयाचा स्वतंत्र समावेश करण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
रावेत : विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात कला विषयाचा स्वतंत्र समावेश करण्यात आला होता. परंतु, शासनाच्या क्रीडा व शिक्षण विभागाने नुकतेच पहिली ते आठवीच्या वर्गाचे परिपत्रक काढून कला विषयांच्या तासिकांना कात्री लावण्यात आली आहे.
त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांमधील सुप्त कला गुण कमी करण्याचा डाव प्रशासनाने आखला असून, त्याला कलाशिक्षकांनी जोरदार विरोध केला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे कलाशिक्षकांना जिकिरीचे होणार आहे़ यापूर्वी कला विषयासाठी स्वतंत्र असणाऱ्या चार तासिकांऐवजी दोनच तासिका ठेवण्यात आल्याने कलाशिक्षकांचे पदच धोक्यात आले आहे. त्यामुळे कलाध्यापकांमध्ये असंतोष पसरला आहे. या परिपत्रकाचा निषेध करीत अध्यापनामध्ये व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी महत्त्वाच्या असलेल्या कला विषयाच्या तासिका दोनवरून पुन्हा चार करण्यात याव्यात, यासाठी पुणे कलाध्यापक संघाच्या वतीने शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्त, उपशिक्षण संचालक विद्यापीठ, संचालक, शिक्षणाधिकारी यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
पहिली ते आठवीसाठी पुन्हा होत्या तशा चार तासिका कला विषयासाठी देऊन कलाध्यापकांसाठी असलेले अन्यायकारक परिपत्रक ताबडतोब शासनाने रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. श्रावण जाधव, सुनील बोरले, बिपीन बनकर, सतीश कवाणे, महिला उपाध्यक्ष हुमेरा शेख, मच्छिंद्र कुसाळकर, संजय शेलार आदी उपस्थित होते.