विरार पूर्वेतील टपाल कार्यालय बंद
By सचिन धर्मापुरीकर | Published: March 9, 2018 06:41 AM2018-03-09T06:41:47+5:302018-03-09T06:41:47+5:30
- शशी करप
वसई : विरार पूर्वेतील टपाल कार्यालय बंद करून पश्चिमेच्या कार्यालयातून कामकाज उरकले जात असल्याने अडीच लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या विरारकरांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे.
या शहरात पूर्व आणि पश्चिमेला दोन टपाल कार्यालये होती. मात्र, इमारत मोडकळीस आल्याने पूर्वेकडील कार्यालय २०१३ साली पश्चिमेच्या कार्यालयात तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरीत करण्यात आले होते. त्या कार्यालयाचा कार्यभार अद्यापही पश्चिमेकडील कार्यालयातून केला जात आहे. पश्चिमेचे कार्यालय आधीच अपुºया जागेत होते. त्यातील पोस्टमास्तरांच्या लहानशा खोलीतूनच पूर्वेकडील कार्यालयाचे कामकाज रेटले जाते आहे. अवघ्या दोनशे फूटाच्या खोलीत कर्मचारी कसाबसा कार्यभार पार पाडीत आहेत. पूर्वेच्या कार्यालयासाठी एका पोस्टमास्तरसह एक कायमस्वरुपी पोस्टमन, ८ कंत्राटी पोस्टमन, एक मदतनीस काम करीत आहेत.
वाढत्या लोकसंख्येमुळे पूर्वेकडील पोस्ट कार्यालयावरचा भारही वाढला आहे. टपाल, स्पीड पोस्ट, पोस्ट बचत खाते, तिकीटे खरेदी, आरटीओची कागदपत्रे, आधार कार्ड अशा कामांचा प्रचंड ताण आहे. त्यासाठी कर्मचारीही अपुरे आहेत. त्याहीपेक्षा याठिकाणची जागा अपुरी असल्याने कार्यालयात कायम गर्दी असते. त्यात कोणत्याही सुविधा नसल्याने कर्मचारी आणि ग्राहकांची गैरसोय होते आहे. पूर्वेकडील कार्यालय बंद करण्यात आल्याने लोकांना पाच-पाच किलोमीटर वरून पश्चिमेकडे यावे लागत आहे. त्यातच अपुरे कर्मचारी आणि जागा यामुळे ताण वाढून कामकाज विस्कळीत झाले आहे. पूर्वेकडील कार्यालय सुरु व्हावे यासाठी मुंबई हायकोर्टात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे.