भोसरी परिसरात उदंड झाले ‘पोस्टर बॉईज’; महापालिकेचे बुडतेय लाखो रुपयांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 05:54 AM2017-12-17T05:54:59+5:302017-12-17T05:55:13+5:30
वाढदिवसापासून ते दशक्रिया विधीपर्यंतचा कोणताही सोहळा फ्लेक्सबाजी केल्या खेरीज पार पडत नसल्याचे चित्र भोसरी परिसरात पहायला मिळत आहे.
भोसरी : वाढदिवसापासून ते दशक्रिया विधीपर्यंतचा कोणताही सोहळा फ्लेक्सबाजी केल्या खेरीज पार पडत नसल्याचे चित्र भोसरी परिसरात पहायला मिळत आहे. फुकट्या ‘पोस्टर बॉईज’मुळे महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे लाखोंचे उत्पन्न बुडत आहे. राजकीय पुढाºयांपुढे प्रशासनाने लोटांगण घातल्याने ‘पोस्टर बॉईज’ला आवर घालणे अशक्य झाले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक फ्लेक्सबाजीचा महापूर भोसरी परिसरात आला आहे. येथील उद्योग आणि अर्थक्षेत्राची जशी वाढ होत गेली तशी जाहिरात क्षेत्राचीही झाली. याचा परिणाम रस्त्यांवरच्या पोस्टर, होर्डिंगच्या संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भोसरी व फ्लेक्सबाजी हे समीकरण बनले आहे. रस्ते, चौक, इमारती, उड्डाणपूल, विजेचे खांब, एवढेच नव्हे, तर झाडांनादेखील खिळे ठोकून अनधिकृतपणे जाहिरातबाजी केली जात आहे.
भोसरी परिसरातील राजकीय नेत्यांचे वाढदिवसाला होणारी फ्लेक्सबाजी अख्ख्या शहरात चर्चेचा विषय ठरते. विशेष म्हणजे वाढदिवस तसेच कार्यक्रमासंदर्भात लावलेले फ्लेक्स अनेक महिने काढले जात नाही. ऊन, वारा, पावसाने हे फ्लेक्स कुजून, फाटून जातात. मात्र, ते उतरवले जात नसल्याने भोसरीचे विद्रुपीकरण वाढत आहे. लांडेवाडी, पीसीएमटी चौक, भोसरी-आळंदी रोड, भोसरी-दिघी रोड, गवळीमाथा परिसर, मॅगझिन चौक हे फ्लेक्सबाजीचे हॉट स्पॉट ठरत आहेत. सर्वच बस थांबे अनधिकृत जाहिरातबाजीचा अड्डा बनले आहेत. नव्याने उभारण्यात आलेल्या काही बस स्थानकांवर संबंधित बस स्थानकावरून जाण्या-येणाºया बसेसचे वेळापत्रक लावले आहे. त्यावर बसची वेळही नमूद असते. मात्र, वेळापत्रकावरदेखील जाहिराती चिकटविल्या आहेत. बसचे वेळापत्रक समजत नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडत आहे.
महापालिकेकडून अनधिकृत फ्लेक्स उतरवताना महापालिकेच्या अतिक्रमण पथकांवर हल्ले होण्याच्या घटना भोसरी परिसरात घडत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन कारवाईला धजावत नाही. भोसरीतील फ्लेक्सवर कारवाई म्हटले की, ‘‘नको रे बाबा’’, अशी प्रतिक्रिया अतिक्रमण पथकाची असते. राजकीय वरदहस्तामुळे भोसरी परिसरात फ्लेक्सबाजी वाढल्याची चर्चा आहे.
- महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागामार्फत जाहिरात कर, परवाना शुल्क आणि महापालिका जागेत जाहिरात फलक असल्यास जागा भाडे आकारणी करून परवाना दिला जातो. महापालिकेच्या जागेवरील आणि खासगी जागेतील अशा दोन प्रकारे महापालिकेला जाहिरात कर प्राप्त होते. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिका आकारत असलेले दर पुणे व मुंबई तसेच अन्य शहरातील दरांच्या तुलनेने अत्यंत कमी आहेत. दर कमी असूनही फुकट्या ‘पोस्टर बॉईज’मुळे महापालिकेचे उत्पन्न बुडीत खात्यात जमा होत आहे.
भोसरी परिसरात लग्न, मुंजीचेही फ्लेक्स लावण्याचा ‘ट्रेंड’ वाढला आहे. वधू-वरांचे छायाचित्रासह लग्न पत्रिकाच फ्लेक्सवर छापली जात आहे. लहान मुलांच्या वाढदिवसाचे फ्लेक्सही सर्रास लावले जातात. महापालिकेकडून अशा एकाही फ्लेक्सवर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.