बटाट्यांची विक्रमी आवक
By admin | Published: March 20, 2017 04:28 AM2017-03-20T04:28:39+5:302017-03-20T04:28:39+5:30
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण बाजारात कांद्याची आवक सलग तिसऱ्या
आसखेड : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण बाजारात कांद्याची आवक सलग तिसऱ्या सप्ताहात घटून भाव मात्र वधारले. कोबी, फ्लॉवरसह बटाट्याची उच्चांकी आवक झाली. जळगाव शेंगाही आवक चांगलीच झाली. लसणाची आवक व भावही स्थिर राहिले. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर, शेपूसह पालक भाजीची प्रचंड आवक झाली. जनावरांच्या बाजारात जर्शी गाई, बैल व शेळ्या-मेंढ्यांच्या संख्येत घसरण झाली. एकूण उलाढाल २ कोटी ९० लाख रुपये झाली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक १५ हजार ३०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ९ हजार ७०० क्विंटलने घटून भावात ५१ रुपयांची वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव ६५० रुपयांवरून ७०१ रुपयांवर पोहोचला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक १ हजार १०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ४०० क्विंटलने वाढल्याने भावात १०० रुपयांची घसरण झाली. बटाट्याचा कमाल भाव ९०० रुपयांवरून ८०० रुपयांवर स्थिरावला.
जळगाव भुईमूग शेंगांची एकूण आवक ४ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक १ क्विंटलने वाढूनही कमाल भाव ७ हजार रुपयांवर स्थिरावले. बंदूक भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक ५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक व कमाल भाव १ हजार २०० रुपयांवर स्थिरावले. हिरव्या मिरचीची एकूण आवक ३४८ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ३६२ क्विंटलने घटली. हिरव्या मिरचीला १,००० ते ३,००० रुपये असा कमाल भाव मिळाला. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजगुरुनगर या मुख्य बाजारात व शेलपिंपळगाव येथील पालेभाज्यांच्या उपबाजारात शेपू व पालक भाज्यांची काहीच आवक झाली नाही. (वार्ताहर)