खड्डे, चर झाले मृत्यूचे सापळे
By admin | Published: July 17, 2017 04:14 AM2017-07-17T04:14:07+5:302017-07-17T04:14:07+5:30
बालेवाडी फाटा ते लक्ष्मीमाता मंदिर रस्त्याची सध्या सुरु असलेल्या पावसामुळे व अर्धवट कामांमुळे दयनीय अवस्था झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बालेवाडी : बालेवाडी फाटा ते लक्ष्मीमाता मंदिर रस्त्याची सध्या सुरु असलेल्या पावसामुळे व अर्धवट कामांमुळे दयनीय अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी पदपथ उखडले गेले असून, त्यावर दगडमातीचे ढीग साचलेले आहेत.
अनेक पदपथांवर दुकानदार, व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथावर जागा नाही. रस्त्याचे काम अर्धवट असून, रस्त्यात पडलेले चर आणि खड्डे मृत्यूचे सापळेच झाले आहेत.
या रस्त्यावर रात्रंदिवस नागरिक, तरुण, विद्यार्थी, तसेच ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ असते;रस्त्याच्या दुतर्फा असलेले दगडमातीचे ढिगारे उचलले गेलेले नाहीत. रस्ता आणि पदपथावर लावण्यात आलेले पेव्हर ब्लॉक उखडलेले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. ना पदपथ, ना धड चालण्यासाठी रस्ता, अशी स्थिती आहे. रात्रीच्या
वेळी अनेकदा स्ट्रीट लाईट बंद असतात.
ठिकठिकाणी कंत्राटदारांच्या गाड्या आणि सामान ठेवण्यात आले आहे. नादुरुस्त, मोठे लोखंडी आणि सिमेंटचे पाईप, सळ्या, रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आदींमुळे हा रस्ता डम्पिंग ग्राऊंडच झाला आहे. नागरिकांनी अनेक तक्रारी करूनसुद्धा पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.
नागरिकांमध्ये त्यामुळे प्रचंड चीड निर्माण झाली आहे.