कामशेतमध्ये पोतराजांची पडली पालं; कर्नाटकातून कुटुंबासह दाखल, २५ वर्षांपासूनचा शिरस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 01:58 PM2018-01-12T13:58:43+5:302018-01-12T14:08:35+5:30
कडकलक्ष्मी नावाची दारी येणारी भिक्षेकरीण ‘दार उघड बया आता दार उघड’ असे मरीआईला आवाहन करत भिक्षा मागणारे पोतराज मागील २० वर्षांपासून दरवर्षी कामशेतमध्ये महिनाभरासाठी दाखल झाले आहेत.
कामशेत : कडकलक्ष्मी नावाची दारी येणारी भिक्षेकरीण ‘दार उघड बया आता दार उघड’ असे मरीआईला आवाहन करत भिक्षा मागणारे पोतराज मागील २० वर्षांपासून दरवर्षी कामशेतमध्ये महिनाभरासाठी दाखल झाले आहेत.
सगळी गडीमाणसे, स्त्रीया कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरता गावोगावी भटकंती करतात. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजाभवानी, रेणुका, यलम्मा, येडाई, काळूबाई, मरीमाता या शक्तिपीठांची वंशपरंपरागत पूजा करीत तिला डोईवर घेऊन गावोगावी भटकंती करतात. पायपीट करीत खेडेगावातून देवीला केलेल्या नवसातून मिळणाऱ्या चिजवस्तू पैसे यातून गुजराण करीत आहेत.
हातातल्या कोरड्याने (चाबकाने) स्वत:च्याच शरीरावर प्रहार करत स्त्री वेशात रस्तोरस्ती पोतराज फिरतात. मोकळ्या सोडलेल्या केसांच्या जटा, कपाळभर हळदी-कुंकवाचा मळवट, कंबरेला अनेक चिंध्यांपासून तयार केलेले घागरावजा वस्त्र, गळ्यात मण्यांच्या माळा व कंबरेला सैलसर घुंघराची माळ बांधलेली आणि पायात खुळखुळ्या घातलेला हा पोतराज व त्याच्या बरोबर डोक्यावर देवीचा मरीआईचा डोलारा व कडक लक्ष्मीचा साज घेऊन भटकंती करणारा पोतराज सर्वांचाच औत्सुक्याचा असतो.
पोतराज मंगळवारी वा शुक्रवारी डफडे वाजवत गावात येतो व गावात मरीआईचा फेरा आल्याची घोषणा करतो. मरीआईने प्रसन्न व्हावे म्हणून पोतराज आत्मपीडनाचा मार्ग अवलंबतो. अंगाला डावी-उजवीकडे डोल देत नाचत असतानाच शेंदूर फासलेला कोरडा हातात घेऊन त्याचे फटके स्वत:च्या अंगाभेवती मारतो. त्यानंतर देव्हाऱ्याचे दार उघडते. मग, त्याच्या अंगात आलेली देवी तिला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पोतराजाच्या तोंडून देते. मग स्त्रिया देवीची पूजा करून तिची ओटी भरतात. पोतराजाला पैसे व सुपातून धान्य दिले जाते ही प्रथा ग्रामीण भागात अजूनही टिकून असून, अनेक पोतराज यावर आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.
कर्नाटकातील रहिवासी असलेले व सद्या बारामतीमध्ये राहणारे निंबाळकर कुटुंबातील मारुती, सुरेश, नारायण हे तीन भाऊ, त्यांची मुले, सुना, नातवंडे आदी आठ कुटुंबाचा सुमारे तिसेक जणांचा कुटुंबकबिला वीस ते पंचवीस वर्षांपासून संक्रांतीच्या सणाच्या एक महिना अगोदर कामशेतमध्ये येतोच.
मुलांच्या शाळेला महिनाभराची सुटी
कामशेत गावठाणातील मोकळ्या जागेत या पोतराजांची पालं उभी राहिली असून, मोठी मंडळी सकाळी सकाळी देवीचा डोलारा घेऊन कामशेत व आजूबाजूच्या गावांमध्ये भिक्षेसाठी जात आहेत. तर लहान मुले आजूबाजूच्या घरी भाकरी मागून खेळत खेळत आपल्या झोपड्या सांभाळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या कुटुंबातील सर्व लहान मुले ही शाळा शिकत असून, सुमारे एक महिना सुटी घेऊन आपल्या घरच्यांना मदतीसाठी येतात. सुमारे तिसेक शाळेत जाणारी बालवाडी ते आठवीत शिकणारी पोरे शाळेतून सुटी घेऊन महिनाभरासाठी आपल्याकडे येतात. अगोदर जनता वसाहतीत राहणारी ही मंडळी आता मुलांच्या शिक्षणासाठी पुण्यात हडपसरला स्थायिक झाले आहेत.