महावितरणचा कारभार : सहा तास वीज खंडित, नागरिक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 03:12 AM2018-05-11T03:12:09+5:302018-05-11T03:12:09+5:30
सायंकाळ झाली आणि वीज गेली. आत्ता येईल मग येईल, असे म्हणत वाजले रात्रीचे बारा़ महावितरणच्या या अनोख्या भेटीने आकुर्डी, निगडी आणि प्राधिकरणातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला.
पिंपरी - सायंकाळ झाली आणि वीज गेली. आत्ता येईल मग येईल, असे म्हणत वाजले रात्रीचे बारा़ महावितरणच्या या अनोख्या भेटीने आकुर्डी, निगडी आणि प्राधिकरणातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला.
तापमानाचा पारा ४० अंशावर पोहोचला आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. नागरिक सकाळी १० नंतर घराबाहेर पडत नाहीत. एसी, फॅन, कुलर याशिवाय राहणे याचा विचारच करणे अशक्य आहे. अशातच बुधवारी आकुर्डी, निगडी, दत्तवाडी, विठ्ठलवाडी, यमुनानगर भागातील वीज तब्बल ६ तास गायब होती. पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटीत समावेश झाला खरा; पण शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीच्या उपाययोजना फोल ठरत आहेत. याचा प्रत्यय नागरिकांना आला.
शहरात महावितरणकडून कोणतेही भारनियमन सुरू नाही. तरीही आकुर्डी भागातील वीज वारंवार खंडित होते. रात्री अपरात्री कधीही वीजपुरवठा खंडित होतो. महावितरणने याची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी कार्यकर्ते प्रफुल्ल पाटील, अजित सकुंडे, पंकज दळवी आदींनी केली आहे.
उन्हाळी वाळवण करण्याचे काम सध्या घराघरांत जोरात सुरू आहे. टेरेसवर ऊन जास्त असल्याने घरातच हॉलमध्ये वाळवणाचे काम सुरू आहे. पण वीज नसल्याने कामे उरकत नाहीत. वर्षभराचा मसाला करण्याचे कामही याच महिन्यात केले जाते. ते ही कामे खोळंबले आहे.
मोबाइल बॅटरी झाली डाऊन
-मोबाइलची बॅटरी डाऊन झाली. त्यामुळे सोशल मीडियाशी नागरिकांचा संपर्क तुटला. त्यातच प्रचंड उकाडा जाणवत असल्याने नागरिकांनी
रात्र रस्त्यावर जागून काढली. रस्त्यावरच पुन्हा गप्पांचा फड रंगल्याचे चित्र दिसत होते.
क्रिकेट रसिकांची नाराजी
-सध्या आयपीएलचा हंगाम सुरू आहे. वीज गेली की किमान ४ ते ५ तास येत नाही. क्रिकेट रसिकांनी वीजवितरणच्या या भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. ऐन सामना सुरू असताना वीज गायब होते. मोबाईलवर सामना पहावा तर बॅटरी डिस्चार्ज झालेली.
परीक्षार्थींच्या डोळ्यांत पाणी
- बारावीच्या विद्यार्थ्यांची गुरुवारी सीईटी परीक्षा होती. त्यामुळे रात्र वैराची असल्यासारखे विद्यार्थी अभ्यास करत होते. पण सायंकाळपासून वीज गायब झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत पाणी आले.
चिमुकल्यांचा हिरमोड
- उन्हाळी सुटीचा हंगाम सुरू आहे. विविध कार्टुन वाहिनीवर मुलांसाठी भरगच्च कार्यक्रम सुरू आहेत. पण वारंवार वीज गेल्याने मुलांना कार्यक्रमाचा आनंद घेता येत नाही. बाहेर अंधार असल्याने पालक घराबाहेरही खेळायला सोडत नाही.
उन्हाचा तडाखा वाढला असताना सहा तास वीज खंडित होते. हा महावितरणचा बेजबाबदारपणा आहे. वारंवार वीज गेल्याने व्यवसायावरही परिणाम होतो. गिरणी, सायबर कॅफे, सलून व्यावसायिक बेजार झाले आहेत. वीजपुरवठा अखंडित सुरू ठेवावा. अन्यथा महावितरणला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
- माजिद शेख, अध्यक्ष जनअधिकार संघटना, आकुर्डी
नागरिकांनी घराबाहेर बसून सहा तास काढले. गावाकडून पाहुणे मंडळी आली. त्यांना तर आपण गावीच असल्याचा प्रत्यय आला. या सर्व प्रकारामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. १२वीच्या विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा गुरुवारी होती. पण त्यांना अभ्यास करता आला नाही. त्यांचे नुकसान महावितरण भरून देणार का?
- मंदार कुलकर्णी, अध्यक्ष, स्वराज्य प्रतिष्ठान
वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. एका महिन्याचे बिल भरले नाही तर महावितरणकडून नोटीस येते. येथे आठवड्यातून कित्येकदा चार ते पाच तास वीज नसते. याला जबाबदार कोण?
- मनीष परब, निगडी
-महावितरणच्या अधिकाऱ्यांशी याबाबत वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अधिकाºयांनी फोन उचलले नाहीत. निगडी, प्राधिकरणातील कार्यालयात नागरिकांनी फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन सतत व्यस्त लागत होता. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. महावितरणच्या कारभाराचा फटका चाकरमान्यांनाही बसला. रात्री झोप न झाल्याने अनेक जण कार्यालयात उशिरा पोहोचले.
-पावसाळ्यापूर्वी वीजपुरवठ्यात कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. परंतु, महावितरणने अद्यापही वीजतारेजवळील झाडांच्या फांद्या काढल्या नाहीत. पावसाळ्यात घर्षण होऊन स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत महावितरणने योग्य ती दक्षता घ्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
लघुउद्योजकांनाही फटका
1जाधववाडी : उन्हाळा आणि बत्ती गुल यांचे जवळचे समीकरण असल्याने जाधववाडीकर सध्या दिवसा व रात्री अनियमित बत्ती गुल अनुभवत आहेत. दररोज दिवसातून तीन ते चार वेळेस विजेचा लपंडाव सुरू आहे. थंडीत गरज नसताना कधीही वीजपुरवठा खंडित होत नाही; परंतु ऐन उन्हाळ्यात घामाच्या धारा निघत असतानाच अनेकदा बत्ती गुलला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यात दिवसा विद्युतपुरवठा खंडित झाल्यास काही वाटत नाही; पण रात्री झाल्यास मात्र नाहक त्रासाला सामोरे जावे लागते.
2वीज नियमितता ही सर्वांनाच जीवनावश्यक बाब असून, सर्वांकरिता अतिमहत्त्वाची आहे. यात प्रामुख्याने लघुउद्योजकापासून ते थेट घरातील महिला वर्गाला मोठा फटका बसत आहे. यात दळणाकरिता जाधववाडीतील महिलावर्ग त्रस्त असलेला पाहायला मिळत आहे. परिसरातील रुग्णालये, शाळा, क्लास, छोटे-मोठे व्यावसायिक, दुग्ध व्यावसायिक यांचे मोठे नुकसान होत आहे.
3सध्या परीक्षेचा कालावधी असल्याने विद्यार्थीवर्गाचे मोठे नुकसान होत आहे. त्यातच अघोषित भार नियमन सुरू झाल्यास नागरिक, उद्योजक, व्यावसायिक, शेतकरी वर्ग यांची पुरती पंचाईत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर महावितरणने काही तरी उपाययोजना कराव्यात. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना योग्य पद्धतीने वीज वितरण केले जावे, अशी मागणी केली जात आहे.