नदीत बुडणाऱ्याचे वाचविले प्राण
By Admin | Published: May 25, 2017 03:00 AM2017-05-25T03:00:43+5:302017-05-25T03:00:43+5:30
सुटीनिमित्त वाल्हेकरवाडी येथील काही तरुण पोहण्याच्या निमित्ताने पुनावळे येथे गेले असता
लोकमत न्यूज नेटवर्क
रावेत : सुटीनिमित्त वाल्हेकरवाडी येथील काही तरुण पोहण्याच्या निमित्ताने पुनावळे येथे गेले असता दुपारच्या वेळी त्यांच्यातील एक युवक रुपम कांबळे (वय १९) नदीपात्राच्या मध्यभागी पोहताना थकल्यामुळे गटांगळ्या खाऊन बुडू लागला.
नदीकिनारी असणाऱ्या पुनावळे गावातील किशोर मोहिते,अविनाश सावंत, किशोर सरवदे, संदीप ढवळे, सचिन बोडसे यांनी ते पाहिले. किशोर मोहिते आणि गौरव मोहिते यांनी त्वरित नदीच्या मध्यभागी पोहोचून बुडत असणाऱ्या रुपमला नदीपात्रात असलेल्या खडकावर आणले. तोपर्यंत गावातील बाकीचे तरुणही खडकापर्यंत पोहोचले. त्यांनी रुपमला प्रथमोपचार दिला. तसेच त्याच्या पोटातील पाणी काढले. तद्नंतर महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी खडकावर अडकलेल्या तरुणांकरिता सुरक्षा बोटीची व्यवस्था केली.
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रवी हेळवर, आबिद खान, गणेश हेळवर यांनी ‘प्रथम मदतनीस’ म्हणून रिक्षाने ताबडतोब महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल येथे रुपम यास अतिदक्षता विभागात दाखल केले.