मतदान केंद्रांवर पूर्वतयारी
By admin | Published: February 21, 2017 02:58 AM2017-02-21T02:58:49+5:302017-02-21T02:58:49+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होणार असून, शहरातील १२ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होणार असून, शहरातील १२ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांतर्गत असणाऱ्या ३२ प्रभागांत मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने मतदानाची पूर्वतयारी पूर्ण झाली असून, मतदान यंत्र आणि साहित्याचे वाटप कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे. मतदान केंद्र, सहायक मतदान केंद्र प्रमुख, केंद्रप्रमुख कर्मचारी मतदानकेंद्रावर दाखल झाले आहेत. मतदान खोल्यांमध्ये विविध मूलभूत सुविधा व मतदानासाठी एकूण १६०८ मतदान केंद्रे सज्ज झाली आहेत.
मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच असणार आहे. शहर परिसरात एकूण १६०८ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये मनपा शाळा व इमारतींचा समावेश असून १५९ मनपा शाळा, ३२४ खासगी इमारती, १ शासकीय व २ एमआयडीसी इमारती अशा एकूण ४८६ इमारतींचा अंतर्भाव आहे. निवडणुकीसाठी एकूण मतदारांची संख्या ११ लाख ९२ हजार ८९ असून पुरुष मतदारांची संख्या ६ लाख ४० हजार ६९६ आहे, तर महिला मतदार संख्या ५ लाख ५१ हजार ३६२ आहे. पुरूष मतदार ५३.७४ टक्के तर महिला मतदारांची संख्या ४६.२५ टक्के आहे. इतर मतदार ३१ असून त्यांची संख्या ०.००२६ टक्के आहे. मतमोजणी शांततापूर्ण व सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी एकूण ८९२५ कर्मचारी व १७८५ पोलीस कर्मचारी अशा एकूण १० हजार ७१० कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या. (प्रतिनिधी)