पतीच्या जाचाला कंटाळून पिंपळ निलख येथे गरोदर महिलेची स्वत: ला पेटवून घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 02:32 PM2018-01-31T14:32:26+5:302018-01-31T14:38:14+5:30
पिंपळे निळख येथे पतीच्या जाचाला कंटाळून गरोदर महिलेने स्वत: ला पेटवून घेऊन आत्महत्या केली, ही घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. मनिषा राजेंद्र प्रजापती असे मृत महिलेचे नाव आहे.
पिंपरी : पिंपळे निळख येथे पतीच्या जाचाला कंटाळून गरोदर महिलेने स्वत: ला पेटवून घेऊन आत्महत्या केली, ही घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. मनिषा राजेंद्र प्रजापती असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक झाली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषा राजेंद्र प्रजापती (वय २५, रा. पिंपळे निलख मूळ रा. उत्तर प्रदेश) हिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. याप्रकरणी पती राजेंद्र प्रजापती (वय २९ रा. पिंपळे निळख) याच्याविरोधात सांगवी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. लग्नाच्यावेळी तुझ्या घरच्यांनी काही दिले नाही. तुझ्या आई वडिलांना मी विकत घेऊ शकतो, असे वारंवार बोलून राजेंद्र मनिषाला मानसिक त्रास देत असे. तो मनिषाला मारहाण देखील करायचा. माहेरच्यांना याबद्दल काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकीही राजेंद्रने तिला दिली होती. या जाचाला कंटाळून दोन दिवसापूर्वी मनिषाने राहत्या घरी रॉकेल ओतून स्वत: ला जाळून घेतले. घटना घडली त्यावेळी पती राजेंद्र प्रजापती हा आंघोळ करत होता तर लहान मुलगा, दीर आणि जाऊ घरात होती.
ती गंभीररित्या भाजली असल्याने, तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मनीषाला एक मुलगा असून ती दोन महिन्याची गरोदर होती. याप्रकरणी मानिषाच्या भावाने मनोजकुमार प्रजापती यांनी सांगवी पोलिसात फिर्याद दिली आहे.