मावळात प्रशासकीय यंत्रणा सज्ज
By admin | Published: February 19, 2017 04:42 AM2017-02-19T04:42:08+5:302017-02-19T04:42:08+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मावळ तालुक्यातील तयारी पूर्ण झाली असून, २१६ मतदान केंद्रांवर १४२८ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
वडगाव मावळ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मावळ तालुक्यातील तयारी पूर्ण झाली असून, २१६ मतदान केंद्रांवर १४२८ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
आवश्यक इव्हीएम मशिन उपलब्ध असल्याने निवडणुकीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याचे निवडणूक अधिकारी सुभाष बागडे व तहसीलदार जोगेंद्र कट्यारे यांनी सांगितले. तालुक्यात निवडणुकीची आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे. दि. २१ फेब्रुवारीला मतदान होणार असून, दि. २३ला मतमोजणी होणार आहे.
पंचायत समितीच्या १० गणांसाठी आणि जिल्हा परिषदेच्या पाच गटांतील जागांसाठीच्या निवडणुकीची सर्व प्रकारची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. मतदानप्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी तालुक्यात एकूण १ लाख ७६ हजार ३७८ मतदार असून, यामध्ये ९२ हजार ३५३ पुरुष, तर ८४ हजार २५ महिला मतदार आहेत. एकूण २१६ मतदान केंद्रे आहेत. मतदान काळात अधिकारी कर्मचाऱ्यांना दोन दिवस प्रशिक्षण देण्यात आले. दि. २० फेबुवारीला मतदान साहित्याचे वाटप तहसील कार्यालय, वडगाव येथे करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आणि अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (वार्ताहर)
तीन गट, पाच गण संवेदनशील
तालुक्यात जिल्हा परिषदेचे तीन गट, तर पंचायत समितीचे पाच गण संवेदनशील व अतिसंवेदनशील घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये तालुक्यात सर्वांत चर्चेत असणाऱ्या वडगाव खडकाळा, इंदोरी सोमाटणे व महागाव चांदखेड गटांचा समावेश आहे. पंचायत समिती गणातील सोमाटणे, बेबडओहळ, खडकाळा, आढे, आढले बुदु्रक या गण, गावांचा समावेश आहे. या सर्वच गट आणि गणांमध्ये राजकीय गट आहेत. अनेक वेळा या गावांमध्ये निवडणुकीच्या काळात दोन गटांत भांडण होऊन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे या केंद्रांवर १०० मीटरवर पोलीस कर्मचारी नियुक्ती व सेक्टर पेट्रोलिंग करण्यात येणार आहे.