आपत्ती निवारणास सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 04:11 AM2017-07-18T04:11:33+5:302017-07-18T04:11:33+5:30
पावसाचा जोर वाढल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांना पूर येऊ शकतो. त्यामुळे महापालिकेच्या वतीने आपत्ती निवारणासाठी
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पावसाचा जोर वाढल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांना पूर येऊ शकतो. त्यामुळे महापालिकेच्या वतीने आपत्ती निवारणासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण केला असून, हा विभाग आपत्ती निवारणासाठी सज्ज राहणार आहे.
औद्योगिकनगरीतून तीन नद्या वाहतात. मावळ आणि मुळशी परिसरात जोरदार पाऊस झाला की शहरातील नद्यांना पूर येत असतो. मावळ आणि मुळशी भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पूरस्थितीवर मात करण्यासाठी नियोजन केले आहे. नद्यांना पूर आला, की नदीकाठच्या झोपडपट्यांतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येते.
पावसाळ्यात शहर परिसरातील विविध ठिकाणी काही आपत्ती निर्माण झाल्यास त्या संबंधितची
करण्यात येणार कार्यवाही याचे नियोजन केले आहे. ३२ प्रभागांनुसार हा आरखडा तयार केला आहे. त्यानुसार स्थापत्य, पाणीपुरवठा, आरोग्य, जलनिस्सारण अशा विविध विभागांना सूचना केल्या आहेत. झाडे पडणे, घरांमध्ये पावसाचे पाणी घुसणे, जलनिस्सारण वाहिन्या तुंबणे असे प्रकार घडतात. त्यामुळे प्रभानिहाय कक्ष चोविस तास कार्यान्वित केले आहेत. याबाबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आढावा बैठकही घेण्यात आली आहे.
अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांचीही मदत घेतली जाते. तसेच जीवरक्षकही, बोटीही सज्ज असणार आहेत. पूरनियंत्रणाबाबत दक्षता घेतल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
महापालिकेच्या वतीने आपत्ती निवारणासाठी आराखडा तयार केला आहे. त्यानुसार विभागनिहाय जबाबदारी निश्चित करून काम सुरू झाले आहे. तसेच आपत्तीसंदर्भात येणाऱ्या विविध विभागांनाही सूचना केल्या आहेत. तसेच पवना धरणातून अधिक प्रमाणावर पाणी सोडल्यास पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे याबाबत दक्षता घेण्यासाठी जलसंपदा आणि धरण क्षेत्रासाठी नियुक्त असणाऱ्या अधिकाऱ्यांशीही संवाद साधला जातो. महापालिका भवनातही कक्ष निर्माण केला आहे. हा कक्ष चोविस तास कार्यान्वित असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपत्ती निवारण कक्षाची मदत घ्यावी. - डॉ. प्रवीण आष्टीकर,
सहायक आयुक्त, आपत्ती निवारण कक्ष