सोहळ्यासाठी देहूनगरी सज्ज
By admin | Published: July 7, 2015 04:22 AM2015-07-07T04:22:45+5:302015-07-07T04:22:45+5:30
श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याच्या दृष्टिकोनातून श्री संत तुकाराममहाराज संस्थान, ग्रामपंचायत आणि प्रशासन यांच्याकडून सर्व तयारी पूर्ण झाली आहे
देहूगाव : श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याच्या दृष्टिकोनातून श्री संत तुकाराममहाराज संस्थान, ग्रामपंचायत आणि प्रशासन यांच्याकडून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यांतील वारकऱ्यांसह कर्नाटकातील दिंड्यादेखील आषाढी वारीसाठी देहूत दाखल झाल्या आहेत.
या पालखी सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे. बंदोबस्तासाठी पुण्यासह सोलापूर, सांगली, ग्रामीण पोलीस व राज्य राखीव दलाची एक तुकडी, गृहरक्षक दलाचे जवान, महिला पोलीस कर्मचारी, पिंपरी-चिंचवड परिसरातील पोलीस मित्र पथक देहूत दाखल झाले आहेत. ही सर्व यंत्रणा परिसरात करडी नजर ठेवून आहे.
तुकोबारायांची पालखी बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या दिवशी पहाटे साडेचार वाजता शिळा मंदिर येथील महापूजा, साडेपाच वाजता विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील महापूजा, ६ वाजता वैकुंठगमण मंदिरात श्री संत तुकाराममहाराज मंदिरातील महापूजा, ७ वाजता पालखी सोहळाजनक श्री नारायणमहाराज समाधी महापूजा, सकाळी ९ वाजता पालखी सोहळा सप्ताह काल्याचे कीर्तन होणार असून, पालखी प्रस्थानाच्या कार्यक्रमाला दुपारी अडीच वाजता सुरुवात होणार आहे.
दरम्यान, दिंड्या देहूमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे देहूतील वातावरण भक्तिमय झाले आहे. येथे विठुनामाचा गजर सुरू आहे. इंद्रायणीचा काठ भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. हरिनामाच्या गजरात वारकरी दंग झालेले दिसत आहेत. (प्रतिनिधी)
पासधारक वाहनांनाच प्रवेश
पालखी प्रस्थानाच्या दिवशी वाहतुकीत बदल करण्यात येणार असून, देहू-आळंदी रस्त्यावरील वाहतूक तळवडे येथील कॅनबे चौकातून चाकणकडे व निगडीकडे वळविण्यात येणार आहे. कोणत्याही जड वाहनाला प्रवेश दिला जाणार नाही. ८ जुलैला प्रस्थानच्या दिवशी लहान वाहने व पालखी सोहळ्यातील पासधारक वाहनांनाच देहूगावात प्रवेश देण्यात येणार आहे. यासह देहू-देहूरोड रस्त्यावरही जड वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे. तसेच, नऊ तारखेला सकाळपासून फक्त दुचाकींनाच प्रवेश देण्यात येणार आहे. मात्र, पालखी देहूतून मार्गस्थ झाल्यानंतर देहू-देहूरोड मार्गावरून कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. देहूरोड ते निगडी या रस्त्यावरील वहातूक दुपारनंतर इतर मार्गांवर वळविण्यात येणार असून, फक्त पालखी सोहळ्यातील पासधारक वाहनांनाच या मार्गावर सोडण्यात येईल. दिंडीची वाहने तळवडेमार्गे निगडी, आकुर्डीच्या मुक्कामाकडे रवाना करण्यात येणार असल्याची माहिती देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिली.
पंढरपुरात पालखी मुक्कामाचा प्रश्नच
जून महिन्यातच समाधानकारक पाऊस झाल्याने पेरणीची कामे उरकली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह सुमारे एक लाख वारकरी भाविक पालखी प्रस्थानाच्या दिवशी दाखल होतील, असा अंदाज आहे. त्यातच ठिकठिकाणच्या पालखीतळांची कामे उरकली नसली, तरी ती कामे पालखी मुक्कामी पोहोचेपर्यंत ही कामे निश्चितपणे उरकली जातील, असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. मात्र, पंढरपूरच्या श्री संत तुकाराममहाराज मठातील पालखी मुक्कामाचा प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नसल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळले आहे. तर, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पंढरपूरच्या इंद्रायणी नदीच्या पात्रात राहुट्या उभारणे अडचणीचे ठरणार असल्याने पालखी सोहळ्यावर त्याचा नेमका काय परिणाम होतो, हे पाहावे लागेल. नुकतीच पंढरपूर येथे झालेल्या पालकमंत्र्यांच्या सभेमध्ये हा मुद्दा ऐरणीवर आला होता. या वेळी किमान एक लाख लोकांच्या निवासाचा आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने नियोजनाच्या दृष्टीने प्रशासनाचीदेखील धावपळ होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
प्रशासकीय यंत्रणा सतर्क
पालखी सोहळ्यासाठी पालखी मार्गावरील व गावातील अतिक्रमणे काढण्यात आली असली, तरीही मुख्य मंदिराच्या समोरील महाद्वारातील पानफूल प्रसादाची दुकाने मात्र न हटविता त्यांच्याकडे प्रशासनाने व संस्थानने काणाडोळा केल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने सोमवारी गावात डासप्रतिबंधक धुराची फवारणी करण्यात आली. मुख्य प्रवेशद्वारातील धोकादायक असलेल्या विद्युत रोहित्राची जागाही बदलण्यात आली असून, विद्युत विभागाकडून भूमिगत विद्युत पुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पालखी सोहळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण व्हावीत यासाठी प्रशासनाने काळजी घेतली आहे. प्रांताधिकारी स्नेहल बर्गे यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी करून कामे तातडीने करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच विभागीय आयुक्तांनीही बैठक घेऊन पालखी मार्गावरील कामाचा आढावा घेतला होता. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क असल्याचे दिसले. त्यामुळे वारकऱ्यांची सोय झाली आहे.