प्राधिकरणास १४ वर्षांनी अध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 01:02 AM2018-09-01T01:02:00+5:302018-09-01T01:02:15+5:30

सदाशिव खाडे यांची निवड : शहरात मुंडे गटाची झाली सरशी

President after 14 years of authority | प्राधिकरणास १४ वर्षांनी अध्यक्ष

प्राधिकरणास १४ वर्षांनी अध्यक्ष

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक सदाशिव खाडे यांची निवड झाली आहे. तब्बल चौदा वर्षांनी प्राधिकरणाला अध्यक्ष मिळाला आहे. प्राधिकरण अध्यक्षपदासाठी मुंडे गटाची सरशी झाली आहे.

औद्योगिकनगरीत पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या निर्मितीपासून ४६ वर्षांपैकी निम्म्याहून अधिक कालावधीत प्रशासकीय राज होते. याचे प्रमुख कारण म्हणजे पिंपरी-चिंचवड शहरात राष्टÑवादी काँग्रेस आणि काँग्रेसने दुसरे सत्ताकेंद्र होऊ नये, म्हणून दक्षता घेत निवडीसाठी टाळाटाळ केली होती. मात्र, शालेय शिक्षणमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे असताना त्यांनी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मदतीने २००१ मध्ये समिती नियुक्त केली होती. अध्यक्षपदी काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब तापकीर यांची निवड झाली होती. त्यानंतर २००४ ला समितीचा कार्यकाल संपुष्टात आल्यानंतर गेली चौदा वर्षे प्राधिकरणावर लोकनियुक्त प्रशासकीय समिती नियुक्त झाली नव्हती.
भाजपाची सत्ता आल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील भाजपा कार्यकर्त्यांनी समितीवर निष्ठावानांना संधी द्यावी, अशी मागणी केली होती. अध्यक्षपदी जुन्यांना की नव्यांना संधी, यावरून पिंपरी-चिंचवडच्या भाजपाच्या नेत्यांमध्ये एकमत होत नव्हते. या पदावर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या समर्थकांनी दावा केला होता.
प्राधिकरणाच्या अध्यक्षपदासाठी मुंडे यांचे समर्थक व पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते सदाशिव खाडे यांच्या नावाची शिफारस महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केली होती. याबाबतचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. खाडे यांच्या नावाची कुणकुण होती.

निष्ठावान कार्यकर्त्याला मिळाला न्याय
राज्य सरकारचा कालखंड संपुष्टात आला, तरी महामंडळे आणि प्राधिकरणाच्या नियुक्त्या होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र, ऐनवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामंडळे आणि प्राधिकरणाच्या अध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या. त्यात खाडे यांना संधी मिळाली आहे. खाडे हे मुंडेसमर्थक असून, शहरात भाजपा वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शहराध्यक्षपदही भूषविले होते. निष्ठावान म्हणून त्यांची ओळख आहे.

Web Title: President after 14 years of authority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.