औद्योगिक क्षेत्रातील गुन्हेगारी रोखणार
By Admin | Published: November 8, 2016 01:36 AM2016-11-08T01:36:25+5:302016-11-08T01:36:25+5:30
औद्योगिक क्षेत्रातील वाढती गुन्हेगारी रोखून परिसरात सुरक्षित वातावरण निर्माण करणार आहे. तसेच महामार्ग व औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांचे दुभाजक तोडणाऱ्या
तळेगाव दाभाडे : औद्योगिक क्षेत्रातील वाढती गुन्हेगारी रोखून परिसरात सुरक्षित वातावरण निर्माण करणार आहे. तसेच महामार्ग व औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांचे दुभाजक तोडणाऱ्या ढाबे, हॉटेल व हॉस्पिटलवर कारवाई करणार आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केले.
तळेगाव दाभाडे एमआयडीसी येथे सोमवारी आयोजित औद्योगिक क्षेत्रातील समस्या व उपाययोजना कार्यक्रमात नांगरे पाटील बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘१००, १०३ व १९१ क्रमांक हे शहरी नेटवर्क टॉवरला जोडल्याने ग्रामीण पोलिसांना घटनास्थळी पोहचण्यास उशीर होतो. गुन्हेगार लूटमार करून व दरोडा टाकून पसार झाल्याने त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होऊन कार्यवाहीत वाढ होते. जेलमधून बाहेर आल्यास त्यांना गुन्हेगारीचे प्रमाणपत्रच मिळाल्यागत बिनधास्त गुन्हे करतात. १००, १०३ व १९१ क्रमांक हे ग्रामीण नेटवर्क टॉवरला जोडण्याचा प्रस्ताव दाखल केला असून, पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचल्याने गुन्हेगारी कारवाया रोखता येतील.’’
एल अॅण्ड टी प्रकल्पप्रमुख कॅप्टन ब्रिजेश कालरा, जी एम प्रकल्पप्रमुख प्रवीण पत्रावली यांनी मनोगत व्यक्त केले.
जेसीबी प्रकल्पप्रमुख डॉ. संतोष गोपीनाथ यांनी प्रास्ताविक केले. सुचित्रा तबीब यांनी सूत्रसंचालन केले. जेसीबी एचआर प्रमुख विवेक गगपल्लीवर यांनी आभार मानले. पोलीस अधीक्षक जय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, उपअधीक्षक बरकत मुजावर, पोलीस निरीक्षक वसंत बाबर, अरुण मोरे, विश्वंभर गोल्डे, मुगुटराव पाटील, सहायक निरीक्षक राजेंद्र पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)