लोणावळा शहरातील ६८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 03:50 PM2019-04-02T15:50:50+5:302019-04-02T15:53:40+5:30
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसह काही राजकीय मंडळीवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे...
लोणावळा : लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान लोणावळा शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, दहशतमुक्त वातावरणात निवडणुका व प्रचार पूर्ण व्हावा याकरिता खबरदारी म्हणून लोणावळा व खंडाळा भागातील ६८ जणांवर लोणावळा शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. यामध्ये काही राजकीय मंडळींचा देखील समावेश आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसह काही राजकीय मंडळीवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. लोकसभा निवडणुक भयमुक्त वातावरणात पार पडणे गरजेचे आहे. या अनुषंगाने शहरातील काही रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे वर्गीकरण करत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये जणावर ही कारवाई करण्यात आली आहे. यासह शहर पोलिसांनी परवानाधारक ५० हत्यारे जमा केली आहेत. निवडणुक आयोगाच्या निदेर्शाप्रमाणे शहरातून जाणारा मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग व शहरात येणाऱ्या इतर मार्गावर नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली जात असल्याची माहिती लोणावळा शहर पोलिसांनी दिली. नागरिकांनी देखील सतर्क राहून निवडणुकीच्या अनुषंगाने काही चुकीचा प्रकार सुरु असल्यास तातडीने पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.