लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई; १७ जणांना तडीपारीचा तडाखा
By नारायण बडगुजर | Published: February 23, 2024 09:07 AM2024-02-23T09:07:17+5:302024-02-23T09:07:38+5:30
लोकसभेची निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार - पोलीस आयुक्त
पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्याअंतर्गत वाकड, दिघी आणि पिंपरीमधील तीन गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई केली. तर वाकड, महाळुंगे, चिखली, देहूरोड आणि पिंपरी परिसरातील १७ गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार केले.
वाकड पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार संदेश ऊर्फ शिलव्या लाजरस चोपडे (रा. अमरदीप कॉलनी, काळेवाडी) याच्यावर १४ गुन्हे दाखल आहेत. दिघी पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार अनिकेत ऊर्फ गुड्या संजय मेटकरे (रा. भारतमातानगर, दिघी) याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. पिंपरी पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार दीपक सुरेश मोहिते (रा. नेहरूनगर, पिंपरी) याच्यावर दहा गुन्हे दाखल आहेत. या तिन्ही गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्या अंतर्गत येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन, महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक, चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक, देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन आणि पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ११ गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार केले.
...यांना केले तडीपार
वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आनंद किशोर वाल्मिकी (२९, रा. काळा खडक, वाकड) याला दोन वर्षांसाठी तर आशिष एकनाथ शेटे (२४, रा. नखाते वस्ती, रहाटणी याला एक वर्षासाठी तडीपार केले. महाळुंगे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संकेत माणिक कोळेकर (२२, रा. धामणे, ता. खेड) याला एक वर्षासाठी तडीपार केले. चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आकाश बाबू नडविन मणी (२१, रा. मोरेवस्ती, चिखली) याला दोन वर्षांसाठी तडीपार केले. देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रोहित उर्फ गबऱ्या राजस्वामी (२२, रा. एमबी कॅम्प, देहुरोड) याला एक वर्षासाठी तर ऋषिकेश उर्फ शऱ्या अडागळे (२४, रा गांधीनगर, देहूरोड) याला दोन वर्षांसाठी तडीपार केले. पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुरज रामहरक जैस्वाल (२१), शुभम राजू वाघमारे (२२, दोघेही रा. नेहरुनगर, पिंपरी), वृषभ नंदू जाधव (२१), शेखर उर्फ बका बाबू बोटे (२०), शुभम अशोक चांदणे (१९), शांताराम मारुती विटकर (३४), अनुराग दत्ता दांगडे (१९, सर्व रा. इंदिरानगर, चिंचवड), सागर ज्ञानदेव ढावरे (२०, रा. मिलींदनगर, पिंपरी), पंकज दिलीप पवार (३२, रा. चिंचवड), सोन्या उर्फ महेश श्वेणसिध्द कांबळे (२१, रा. दत्तनगर, चिंचवड), आनंद नामदेव दणाणे (३१, रा. विद्यानगर, चिंचवड) या सर्वांना दोन वर्षांसाठी तडीपार केले.
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही गुन्हेगारांवरील कारवाई सुरूच आहे. यंदा तीन गुन्हेगारी टोळ्यांमधील १९ जणांवर ‘मोका’ लावला. तीन गुन्हेगारांना स्थानबद्ध केले. तर १७ गुन्हेगारांना तडीपार केले. असे एकूण ३९ गुन्हेगारांवर कारवाई केली. लोकसभेची निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे. - वसंत परदेशी, अपर पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड