क्रीडा आणि लष्करी सेवेचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:41 AM2018-11-11T00:41:41+5:302018-11-11T00:42:03+5:30
राहुल जाधव : मुरलीकांत पेटकर यांचा घरी जाऊन सन्मान
पिंपरी : महापौर राहुल जाधव यांनी लष्करी सेवा करणारे खेळाडू मुरलीकांत पेटकर यांची भेट घेऊन कार्याचा गौरव केला. महापालिकेच्या वतीने सत्कार केला. ‘देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या लष्करी अधिकाºयास, खेळाडूचा महापालिकेला सार्थ अभिमान असून, त्यांच्या अनुभवाचा उपयोग खेळाडू घडविण्यासाठी करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
दिवाळीच्या दिवशी खेळाडू आणि लष्करातील सेवेत योगदान देणाºया पेटकर यांच्या काळेवाडीतील निवासस्थानी जाऊन कार्याचा गौरव केला. विविध पुरस्कार आणि अष्टपैलू कामगिरीचा आढावा घेतला. चर्चा केली. या वेळी कबड्डीतील राष्ट्रीय खेळाडू नीलेश लोखंडे, योगेश सासवडे उपस्थित होते.
महापौर जाधव म्हणाले, ‘‘पेटकर यांनी हाइडलबर्ग जर्मनी येथे १९७२ मध्ये पॅराआॅलिम्पिक स्पर्धेत व्यक्तिगत सुवर्णपदक मिळविले होते. त्यांनी ५० मीटर फ्री-स्टाइल पोहण्याच्या स्पर्धेत ३७.३३ सेकंदांमध्ये अंतर पार करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. त्याच वर्षी त्यांनी अचूक भालाफेक व अडथळ्यांची शर्यत यामध्येही सहभाग घेतला आणि या तीनही स्पर्धांमध्ये ते अंतिम फेरीत पोचले होते. हाँगकाँग इथे १९८२ मध्ये झालेल्या फेस्पिक-क्रीडा स्पर्धेत पोहण्याच्या स्पर्धेत त्यांनी सुवर्ण व कांस्य पदके मिळवली. त्यानंतर टोकियो आॅलिम्पिक स्पर्धेत बॉक्सिंगमध्येही सहभाग नोंदवून रौप्यपदक मिळविले. इंग्लंडमध्ये झालेल्या अपंगांसाठीच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये पेटकर यांनी १४० हून अधिक पदके जिंकलेली आहेत. भारतीय सैन्यात ईएमई विभागामध्ये ते क्राफ्टमन पदावरील खासगी जवान म्हणून कार्यरत होते. पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात बंदुकीच्या गोळ्या लागून गंभीर इजा होऊन अपंगत्व आले. महाराष्ट्रातील क्रीडापटूंसाठीचा सर्वोच्च छत्रपती पुरस्कारही त्यांना दिलेला आहे. असा खेळाडू आपल्या शहरात वास्तव्यास आहे.’’
देशासाठी खूप मोठे योगदान देणारे देशभक्त आहेत. अभिवादन करण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो होतो. अशा दिग्गज खेळाडूंच्या अनुभवाचा उपयोग शहरातील क्रीडा विश्वासाठी करण्यात येणार आहे. शहरातील क्रीडा क्षेत्राचा विकास करायचा असेल तर अशा गुणी खेळाडूंचा समोवश क्रीडा धोरणात केला जाणार आहे. याविषयी चर्चा करण्यात आली. महापालिकेतर्फे त्यांचा यथोचित गौरव केला जाईल.
- राहुल जाधव, महापौर,