कुरुळीतील हॉटेलवर छापा, ६३ हजारांचे मद्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 01:15 AM2018-12-19T01:15:32+5:302018-12-19T01:15:56+5:30

६३ हजारांचे मद्य जप्त : नाताळ व ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कारवाई

Printed in Kuruli hotel, 63 thousand liquor seized | कुरुळीतील हॉटेलवर छापा, ६३ हजारांचे मद्य जप्त

कुरुळीतील हॉटेलवर छापा, ६३ हजारांचे मद्य जप्त

Next

चाकण : नाताळ व ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करून कुरुळी (ता.खेड) येथील एका हॉटेलवर छापा टाकून ६३ हजार रुपयांचे विदेशी मद्य जप्त करून एकास अटक केली आहे.

तळेगाव दाभाडे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक व त्यांच्या पथकाने पंचासह सोमवारी (दि.१७) साडेसहाच्या सुमारास दारूची छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कुरुळीच्या हद्दीत पुणे-नाशिक महामार्गावरील एका हॉटेलमागे बागडेवस्ती येथे छापा घातला. यावेळी तपासणी केली असता या ठिकाणी अरुणाचल प्रदेश व हरियाणा राज्यात विक्रीकरिता नेत असलेल्या विदेशी दारूच्या विविध ब्रँडच्या जवळपास ५४ हजार २७० रुपये किमतीच्या बाटल्या आढळल्या. यापैकी मद्यामध्ये काही बाटल्यांच्या लेबलवर सदर मद्य अरुणाचल प्रदेश व हरियाणा राज्यात विक्रीकरिता असल्याचे दिसून आले. पोलिसांनी याप्रकरणी महेश सूर्याअण्णा शेट्टी याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता या मद्याच्या बाटल्या या वाकड येथील विशाल गायकवाड आणून देत असल्याचे सांगितले. आरोपीने दिलेल्या माहितीवरून: पोलिसांनी वाकड येथील विशाल गायकवाड याच्या घरावर धाड टाकली. त्याच्या घरातून ८ हजार ९८० रुपयांच्या दारूच्या बाटल्या विनापरवाना मिळून आल्या. त्याच्या घरात यावेळी विजय माणिक गायकवाड होता. त्यास पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, हा माल बाहेरून राज्यात आणून त्याचे लेबल बदलवून तो महाराष्ट्रात विक्रीकरिता नमूद असलेल्या मोकळ्या बाटल्यामध्ये भरून जास्त नफा मिळवण्याच्या उद्देशाने विक्री करीत असल्याचे सांगितले. तसेच, परराज्यातील कमी दराचे मद्य आणून ते महाराष्ट्र राज्याच्या दराप्रमाणे विक्री करीत असल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
त्यानंतर कार्यालयात येऊन आरोपीकडे या प्रकारात सहभागी असलेल्यांची चौकशी करण्यात आली. संशयित विशाल माणिक गायकवाड हा अद्याप फरार आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी, एस. डी. फुलपगार, संजय पाटील, उपअधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. एल. खोत यांच्या पथकाने केली. या कारवाई मध्ये एन. एन. होलमुखे, दुय्यम निरीक्षक आर. ए. दिवसे, सहायक दुय्यम निरीक्षक अशोक राऊत, बी. एस. रणसुरे , बी. एस. राठोड, श्रीमती एस. टी.भरणे, जवान अर्जुन भताने यांनी भाग घेतला. अर्जुन भताने यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास निरीक्षक आर. एल. खोत हे करीत आहेत.
 

Web Title: Printed in Kuruli hotel, 63 thousand liquor seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे