पोलिस ‘लाॅकअप’मधील आरोपींसाठी दरडोई १०० रुपये कैदी भत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 02:06 PM2022-12-13T14:06:23+5:302022-12-13T14:08:20+5:30
या लाॅकअपमधील आरोपींना नियमित जेवण देण्यासह त्यांना इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात....
पिंपरी : विविध गुन्ह्यांतर्गत काही आरोपींना पोलिसांच्या ‘लाॅकअप’मध्ये जावे लागते. अशा आरोपींना जेवण देण्याची व त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी पोलिसांची असते. लाॅकअपमधील आरोपींसाठी कैदी भत्ता म्हणून दररोज प्रत्येकी १०० रुपये खर्च केले जातात.
महिला आरोपींसाठी एक लाॅकअप
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत १७ पोलिस ठाणी आहेत. यातील सात पोलिस ठाण्यांमध्ये लाॅकअप आहे. यातील एक लाॅकअप महिलांसाठी आहे. या लाॅकअपमधील आरोपींना नियमित जेवण देण्यासह त्यांना इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. यात काही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी होते, काही आरोग्याच्या कारणांस्तव रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे लाॅकअपमधील आरोपींची संख्या कमी-अधिक होते. त्यानुसार पोलीस ठाण्याकडून त्यांच्या चहा व जेवणाचे नियोजन केले जाते.
लाॅकअपमध्ये २५ आरोपी
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयांतर्गत असलेल्या लाॅकअपची ३४ आरोपींची क्षमता आहे. या लॉकअपमध्ये सोमवारी (दि. १२) २५ आरोपी होते. पोलीस कोठडीत (लाॅकअप) असलेल्या आरोपींना कच्चे कैदी म्हणतात. यात महिला आरोपीही असतात. त्यांच्या चहा, नाश्ता, जेवण या खर्चाला कैदी भत्ता म्हणतात.
दररोज दोन वेळा चहा, दोन वेळा जेवण
लाॅकअपमधील आरोपींना जेवण देण्यासाठी आयुक्तालय स्तरावर एका संस्थेला कंत्राट दिले आहे. कैदी भत्ता म्हणून दरडोई ९९.७५ रुपये खर्च केला जातो. लाॅकअपमध्ये किती आरोपी आहेत, त्यानुसार चहा व जेवण याबाबत संबंधित पोलीस ठाण्याकडून संस्थेला माहिती दिली जाते. त्यानुसार संबंधित संस्थेकडून लाॅकअपमधील आरोपींना दररोज दोन वेळा चहा व दोन वेळा जेवण पुरविले जाते.
लाॅकअपची नियमित साफसफाई
आयुक्तालयांतर्गत असलेल्या लाॅकअपची अंशकालीन कर्मचाऱ्यांकडून साफसफाई केली जाते. तसेच आरोपींसाठी आवश्यकतेनुसार वैद्यकीय सुविधादेखील तत्काळ उपलब्ध करून दिली जाते. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालय, सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालय येथे आरोपींची आरोग्य तपासणी तसेच उपचारदेखील केले जातात.