खासगी शिकविण्याचा धंदा तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 02:43 AM2018-06-13T02:43:17+5:302018-06-13T02:43:17+5:30

सध्या खासगी शिकवणी लावण्याची प्रथा शहरात वाढली आहे. बहुतेक विद्यार्थ्यांना खासगी शिकवणी लावलेली असल्याचे वास्तव समोर येत आहे.

Private Coaching Classes News | खासगी शिकविण्याचा धंदा तेजीत

खासगी शिकविण्याचा धंदा तेजीत

Next

चिंचवड : सध्या खासगी शिकवणी लावण्याची प्रथा शहरात वाढली आहे. बहुतेक विद्यार्थ्यांना खासगी शिकवणी लावलेली असल्याचे वास्तव समोर येत आहे. गल्लीबोळात सुरू झालेल्या या व्यवसायाचे बाजारीकरण झाले असून, या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. शिक्षण पद्धतीचे बाजारीकरण झाल्याने विद्यार्थ्यांची गळचेपी होत असून, पालक भरडले जात आहेत. यामुळे शालेय शिक्षण पद्धतीची घसरण होत असून, खासगी शिकवणीचा धंदा सध्या तेजीत आहे.
पूर्वीच्या काळी शिकवणी ही चैन वाटत होती. केवळ श्रीमंतांचीच मुले शिकवणी लावत असत. मात्र साधारणपणे अवघड जाणाऱ्या विषयांना शिकवणी लावण्याची पद्धत होती. आता शिकवणीची पद्धत एवढी वाढली आहे की, पूर्वीच्या काळी कोणी शिकवणी न लावता शिकत होते असे म्हटले तर तरुण पिढीला आश्चर्य वाटते. सध्या शिकवणी शाळेइतकीच महत्त्वाची झाली आहे. पूर्वी गणित आणि इंग्रजी या विषयांची शिकवणी लावलेली असे. कारण इंग्रजी मुळातच अवघड वाटते आणि गणिताला सरावाची गरज असते. पण आता मराठी, हिंदी, भूगोल, विज्ञान याही विषयांना अगदी चौथीपासून शिकवणी लावलेली असते. पूर्वी शाळेच्या मुलांना शिकवण्या लावल्या जात, पण आता कॉलेजच्या मुुलांना सुद्धा शिकवण्या लावल्या जातात. पदवीधर झालेल्या मुलांनी नोकºया मागत फिरण्यापेक्षा शिकवणी वर्ग सुरू करून नोकरीपेक्षा अधिक कमाई सुरू केली आहे.
त्यासाठी विशेष भांडवल लागत नसल्याने घरात अथवा एखाद्या छोट्याशा गाळ्यातही अशा प्रकारचे व्यवसाय थाटले जात आहेत. इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक पंचवीस ते पन्नास हजारांपर्यंत फी आकारली जात असून, मराठी माध्यमासाठी बारा ते तीस हजारांपर्यंत फी घेतली जात आहे. शिक्षण पद्धती पालकांच्या लक्षात येत नाही.

शाळेच्या व्यस्त दिनक्रमातून थोडा वेळ मिळताच मुलांना शिकवणीसाठी पाठविले जात असल्याने मुलांचे मैदानी खेळ बंद होत आहेत. काही नामांकित क्लास वर्षभर अगोदर मुलांची नावनोंदणी करून घेत आहेत. मुलांना येथे प्रवेश मिळावा यासाठी पालकही अशा ठिकाणी पैसे भरून प्रवेश निश्चित करत आहेत. दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर यशस्वी विद्यार्थी कोणत्या क्लासचे आहेत हे दर्शविण्यासाठी मोठमोठ्या जाहिराती केल्या जात आहेत. पालक अशा पद्धतीला भुलत असल्याने हे व्यावसायिक मनमानी पद्धतीने पैसे घेत आहेत. शालेय शिक्षणाची गुणवत्ता खालावत असल्याने खासगी शिकवणीचा व्यवसाय सध्या जोमात आहे. अशा व्यवसायावर काही निर्बंध लावण्याची गरज असल्याचे मत पालकांकडून व्यक्त होत आहे.
खासगी शिकवणीत एका वेळी तीस ते चाळीस विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. दिवसभरात पाच ते सहा तास विविध इयत्तांच्या विद्यार्थ्यांचे क्लास घेतले जातात. विशिष्ट विषयाच्या शिक्षणासाठी वेगवेगळी फी घेतली जात आहे. यासाठी काही विशेष शिक्षकांची नियुक्ती केली जात आहे. काही शाळांतील शिक्षक वेगवेगळ्या भागात जाऊन शिकवणी घेत आहेत.

Web Title: Private Coaching Classes News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.