सरकारी डॉक्टरांच्या नावावर खासगी रुग्णालये!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 01:43 PM2022-11-07T13:43:42+5:302022-11-07T13:45:40+5:30
पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेचे मुख्य आठ तसेच छोटे छोटे दवाखाने आहेत...
पिंपरी : शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयांमध्ये सेवा देत असलेल्या डॉक्टरांनी स्वत:च्या किंवा पत्नीच्या नावावर रुग्णालये सुरू केली आहेत. बॉम्बे नर्सिंग होमची परवानगी घेऊन खासगी रुग्णालये सुरू करीत असल्याचे आढळले आहे. मात्र, नोंदणीत चापलुसी केली जात असल्याने तसेच थेट पुरावे नसल्याने प्रशासनास कारवाई करणे मुश्किल झाले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेचे मुख्य आठ तसेच छोटे छोटे दवाखाने आहेत. तसेच चिंचवड येथे कामगार रुग्णालय आणि औंध येथे जिल्हा रुग्णालय आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात साडेपाचशेहून अधिक दवाखाने आणि रुग्णालये आहेत. तसेच अनेकजण प्रॅक्टिसही करीत असतात. तसेच काही डॉक्टर शासकीय वेळेशिवाय व्हिजीटिंग डॉक्टर म्हणूनही काम करीत आहेत. त्याकडे दुर्लक्ष होत आहे. शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयांमध्ये सेवा देत असलेल्या डॉक्टरांना स्वत: खासगी रुग्णालय सुरू करता येत नाही. त्यांची मुलगी, मुलगा किंवा पत्नीच्या नावावर रुग्णालये सुरू केली आहेत. शासकीय ड्युटीशिवाय ते तेथेही काम करीत असतात.
सरकारी डॉक्टरांच्या नावावर रुग्णालये ?
सांगवी, काळेवाडी, थेरगाव, भोसरी, पिंपरी या भागात सरकारी डॉक्टराच्या नातेवाइकांची रुग्णालये आहेत. त्यात स्कीन, दंत, स्त्रीरोग, हृदयरोग, नाक, कान, घसा, डोळे अशा विविध स्पेशालिस्टचे पत्नी, मुलगी, मुलगा यांच्यानावे दवाखाने आहेत. त्यातील काहीजण महापालिका, जिल्हा तसेच कामगार रुग्णालयात, तसेच पुण्यातील शासकीय रुग्णालयात काम करीत आहेत.
पत्नीच्या नावावर रुग्णालये
शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयांमध्ये सेवा देत असलेल्या डॉक्टरांनी स्वत:च्या किंवा पत्नीच्या नावावर रुग्णालये सुरू केली आहेत. पती शासकीय आणि पत्नीचे रुग्णालय असेही प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये आहेत. तेथेही इतर वेळी पत्नीच्या दवाखान्यात सेवा देत आहेत.
शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयांमध्ये सेवा देत असलेल्या डॉक्टरांना स्वत:च्या नावांवर दवाखाना सुरू करता येत नाही. याबाबत महापालिकेकडे अद्याप माहिती उपलब्ध नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
-वैद्यकीय अधिकारी