मावळ तालुक्यात खासगी सावकारांचा सुळसुळाट, गोरगरिबांना त्रास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 01:21 AM2018-12-27T01:21:22+5:302018-12-27T01:21:45+5:30

मावळ तालुक्यात गावोगावी खासगी सावकारांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यांना मंदीच्या काळातही अच्छे दिन आले आहेत. मात्र वीस ते पंचवीस टक्के व्याज भरून गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.

Private money lenders in the Maval taluka, troubles of the poor | मावळ तालुक्यात खासगी सावकारांचा सुळसुळाट, गोरगरिबांना त्रास

मावळ तालुक्यात खासगी सावकारांचा सुळसुळाट, गोरगरिबांना त्रास

googlenewsNext

वडगाव मावळ -  कमी भांडवलात जास्त नफा मिळत असल्याने मावळ तालुक्यात गावोगावी खासगी सावकारांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यांना मंदीच्या काळातही अच्छे दिन आले आहेत. मात्र वीस ते पंचवीस टक्के व्याज भरून गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. तर काही जण गुंडाच्या वसुली पथकाच्या भीतीने पळून गेले आहेत. या सावकारांना आळा घालण्यासाठी शासनाला कधी जाग येणार, असा सवाल सावकारांमुळे त्रस्त झालेल्या गोरगरीब जनतेने केला आहे.

मावळ तालुक्यात गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर झाले आहेत. त्यात बोगस व्यवहाराचे प्रमाण वाढले आहे. या व्यवहारातून काही जण कोट्यधीश झाले आहेत. मिळालेल्या पैशांतून काही जणांनी हा व्याजाचा गोरखधंदा सुरू केला आहे. दहा टक्क्यांपासून ते तीस टक्क्यांपर्यंत व्याजाने पैसे वाटले जातात. त्या मोबदल्यात कोरे धनादेश, घरे, शेती स्टँपवर लिहून घेतात. परंतु व्याजाचा दर भयानक असल्याने घेतलेली रक्कम कधीच फिटू शकत नाही. कालांतराने त्याच्या घराचे किंवा शेतीचे धमकावून खरेदीखत करून घेतले जाते. दहशतीच्या दबावाखाली कर्जदार काही बोलू शकत नाही, असे प्रकार तालुक्यात गेल्या दहावर्षांत अनेक घडले. तर काही जण सावकाराच्या भीतीने पळून गेले. काहींनी आत्महत्या केल्या; परंतु ते उघडकीस आले नाही.

याबाबत सहायक निबंधक सहकारी संस्था तथा सावकारांचे सहायक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी म्हणाले, ‘‘मावळ तालुक्यात दोन खासगी सावकारांवर कारवाई केली आहे. तालुक्यात ५० सावकार परवानाधारक आहेत. त्यांचा व्याजदर दरसाल दरशेकडा १५ टक्के तारण ठेवून व बिगर तारण १८ टक्के आहे. खासगी सावकार २० ते ३० टक्के दराने महिन्याचे व्याज लावून गोरगरिबांची पिळवणूक करतात़ अशा खासगी सावकारांनी तुमच्याकडून कोरे धनादेश, अगर कोरे स्टँप घेऊन ब्लॅकमेल करीत असल्यास ती माहिती पुराव्यासह आमच्याकडे दिल्यास कठोर कारवाई केली जाईल.’’

तालुक्यातील देहूरोड, तळेगाव, वडगाव, कामशेत, लोणावळा या प्रमुख शहरांत हा सावकारकीचा धंदा राजरोसपणे चालू आहे. सावकारकीच्या व्यवसायाचे जाळे आता खेड्यापाड्यांतही पोहोचले आहे. कमी रकमेत जास्त मलई मिळत असल्याने या धंद्याच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. सावकारांच्या हातात, गळ्यात सोने पाहिले तर मोजता येणार नाही हे किती वजनाचे आहे. मात्र काही कर्जदारांच्या घरातील आईच्या किंवा पत्नीच्या गळ्यात दोन वाट्यांचे मंगळसूत्रही राहिले नाही. तर काही तरुणांनी डान्सबारमध्ये जिवाची मौजमजा करण्यासाठी घेतलेल्या पैशामुळे त्यांच्या आई-वडिलांना सावकारांचे पैसे देण्यासाठी घरदार विकण्याची वेळ आली आहे. विविध कारणांसाठी पैशांची गरज भासल्यास बँकेत किंवा एखाद्या पतसंस्थेत लगेच मिळत नाही. पर्यायाने छोटे मोठे व्यापारी, रेल्वे व इतर कामगार सावकारांकडे धाव घेतात.

अनेक वेळा अशी प्रकरणे पोलीस ठाण्यात जातात. पण काही पोलीस सावकारांची बाजू घेऊन त्या कर्जदाराकडून वसुली करतात. गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांनी आपल्या खाकी वर्दीचे इमान राखून झगडले पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
 

Web Title: Private money lenders in the Maval taluka, troubles of the poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.