संस्कार प्रतिष्ठानच्या संचालकांविरुद्ध फिर्याद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 04:39 AM2017-08-06T04:39:57+5:302017-08-06T04:39:57+5:30
आर्थिक लाभाचे आमिष दाखविणाºया विविध योजना, उपक्रमांच्या माध्यमातून बचत गटाच्या महिला तसेच अन्य नागरिक यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यांना लाभ अथवा गुंतवणुकीची
पिंपरी : आर्थिक लाभाचे आमिष दाखविणाºया विविध योजना, उपक्रमांच्या माध्यमातून बचत गटाच्या महिला तसेच अन्य नागरिक यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यांना लाभ अथवा गुंतवणुकीची रक्कम परत न देता आर्थिक फसवणूक केली, अशी फिर्याद संस्कार ग्रुपच्या अध्यक्षासह संचालकांविरोधात दाखल करण्यात आली आहे. जानेवारीत गुन्हा दाखल झाला होता, आणखी काही महिलांनी नुकतीच दिघी पोलीस चौकीसमोर निदर्शने केली. त्यामुळे पोलिसांनी शुक्रवारी त्या महिलांची तक्रार दाखल करून घेतली आहे.
संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक वैकुंठ कुंभार, अभिषेक घारे, राजू बुचडे व अन्य संचालक, कार्यालयीन कर्मचारी, एजंट यांच्याविरोधात पोलिसांकडे गुंतवणूकदारांच्या तक्रारी दाखल होऊ लागल्या आहेत. दिघी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पुणे-आळंदी रस्त्यावर वडमुखवाडी येथे संस्कार ग्रुपचे कार्यालय आहे. संस्कार ग्रुपच्या नावाखाली शैक्षणिक उपक्रम, रियल इस्टेट, बचत गट एकत्रीकरण, संस्कार एज्युकेशन सोसायटी, विमा योजना, संस्कार क्लब अशा विविध फर्मच्या माध्यमातून १५ मार्च २०१३ ते फेब्रुवारी २०१६ पर्यंत गुंतवणूकदारांकडून पैसे जमा केले. गुंतवणूकदारांना जादा व्याज, नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले गेले. संस्कार महिला बचत गट महासंघाच्या माध्यमातून जमा केलेले २९ लाख १० हजार ५६६ रुपये अद्याप गुंतवणूकदारांना परत दिले गेले नाहीत.
त्यामुळे संस्कार ग्रुपचे संचालक, कार्यालयीन कर्मचारी आणि एजंट यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमिला दरेकर यांच्या पुढाकाराने महिलांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दिघी पोलीस चौकीत संस्थापक वैकुंठ कुंभार यांच्यासह राणी कुंभार आणि संचालक, एजटांविरोधात फिर्याद दिली आहे. संस्कार प्रतिष्ठानच्या विरोधात आवाज उठवूनही पोलिसांकडून योग्य ती कारवाई होत नाही. याबद्दल महिलांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.
- पोलिसांकडून संस्कार प्रतिष्ठानच्या संचालकांविरुद्ध कारवाई करण्यात हलगर्जीपणा दाखविला जात असल्याचा आरोप गुंतवणुकदारांनी केला. या बद्दल दिघी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक खंडेराव खैरे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले अध्यक्ष, संचालक, एजंट अशा सहा जणांविरुद्ध यापूर्वीच गुन्हा दाखल केलेला आहे. त्यातील तिघांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. उर्वरित तीन जण फरार आहेत. पोलिसांकडून आवश्यक ती कारवाई करण्यात आली आहे.