प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट पवनानदीत
By admin | Published: May 13, 2017 04:36 AM2017-05-13T04:36:08+5:302017-05-13T04:36:08+5:30
मामुर्डी, किवळे, सांगवडे व गहुंजे परिसरात पवना नदीत जलपर्णीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. मात्र नदीपात्रात कपडे व गोधड्या
लोकमत न्यूज नेटवर्क
किवळे : मामुर्डी, किवळे, सांगवडे व गहुंजे परिसरात पवना नदीत जलपर्णीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. मात्र नदीपात्रात कपडे व गोधड्या धुण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. गहुंजे, मामुर्डी व किवळेतील स्मशानभूमीत अंत्यविधींनंतर निर्माण होणारी रक्षा थेट नदीत टाकली जात असल्याने प्रदूषण वाढत आहे. कॅन्टोन्मेन्ट हद्दीतील देहूरोड बाजारपेठ, आंबेडकरनगर, गांधीनगर, राजीव गांधीनगर, शितळानगर नं. एक व दोन, विकासनगर रस्त्यालगत संकल्पनगरी परिसरातील गृहसंकुले, मामुर्डी तसेच थॉमस कॉलनी भागातील सांडपाण्यावर कॅन्टोन्मेन्ट प्रशासनाकडून कोणतीही प्रक्रिया केली जात नसून सांडपाणी थेट नदीत जात आहे. या सांडपाण्यामुळे किवळे गावठाण व सांगवडेकडे जाणाऱ्या रस्त्याने ये-जा करताना दुर्गंधीचा सामना करावा लागतो.
गहुंजे गावठाण येथे पवनेवरून देहूरोड लष्करीतळासाठी लष्करी अभियांत्रिकी सेवा (एमईएस) या संस्थेमार्फत पाणी उचलून विविध भागात पुरवठा करण्यात येतो. गहुंजेतील अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम व मैदानासाठी गहुंजेतच पाणी योजना राबविली असून येथून पाणी उचलले जाते. किवळेनजीक मामुर्डी हद्दीत पवनेवरून देहूरोड कॅन्टोन्मेन्टची सोळा एमएलडी क्षमतेची स्वतंत्र पाणीयोजना राबविली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील वीस लाखांहून अधिक लोकसंख्येसाठी रावेत येथून पाणी उचलले जाते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) पाणी पिंपरी- चिंचवड परिसरातील उद्योगांसाठी दररोज उचलत आहे. हवेलीतील पूर्वेकडील वाघोली परिसरातील विविध गावांसाठी राबविलेल्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठीही रावेत येथूनच पाणी उचलले जाते. गहुंजे ते रावेत दरम्यान शेती, पिण्यासाठी, लष्कर व औद्योगिक वापरासाठी पवनेच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पवन मावळा व हवेलीच्या किवळे -रावेत भागात पवना नदीबद्दल प्रत्येकाला आत्मियता वाटते.
गहुंजे व सांगवडे भागात लोकसंख्या कमी असल्याने प्रदूषणाचे प्रमाण कमी आहे. उत्सवकाळात मूर्ती व निर्माल्य थेट नदीत टाकण्यात येते. गहुंजे, मामुर्डी व किवळे येथील स्मशानभूमीतील रक्षा थेट नदीत टाकण्यात येते. सांगवडे येथील शेतकरी मारुती आमले यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव गोपाळ व किसन आमले यांनी रक्षा विसर्जन पाण्यात न करता स्मशानभूमी परिसरात मोठा खड्डा घेऊन त्याठिकाणी वृक्षरोपण करून प्रदूषण न करण्याबाबतच संदेश दिला होता. अशा विविध उपक्रमांना नदीकाठच्या गावांत शासनस्तरावर प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त होत आहे.
पवना प्रदूषणाला मोठ्या प्रमाणात किवळे-विकासनगर व मामुर्डी परिसरात सुरुवात होते. या भागातील विविध ओढे व नाल्यांतून देहूरोड बाजारपेठ, आंबेडकरनगर, गांधीनगर, राजीव गांधीनगर, शितळानगर नं. एक व दोन, विकासनगर रस्त्यालगत संकल्पनगरी परिसरातील गृहसंकुले, मामुर्डी
तसेच थॉमस कॉलनी भागातील सांडपाणी वाहत नदीपात्रात जाते.
किवळे गावठाण व सांगवडे रस्त्यालगत सांडपाण्याला दुर्गंधी येते. काही ठिकाणी मोठा फेस दिसून येतो. कॅन्टोन्मेन्ट हद्दीतून नदीत येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया केली
जात नाही. देहूरोडच्या सांडपाण्यामुळे किवळे गावठाण व सांगवडेकडे जाणाऱ्या रस्त्याने ये-जा करताना दुर्गंधीचा सामना करावा लागतो.
महापालिका किवळे, मामुर्डी या भागात कायमस्वरूपी निर्माल्य कुंड्यांची व्यवस्था करीत नसल्याने बहुतांशी रहिवाशी निर्माल्य थेट नदीत टाकतात. मामुर्डी, किवळे भागात नदीपात्रात वाहन, कपडे व गोधड्या धुणे मोठ्या प्रमाणात होत आहे.