मूकमोर्चाद्वारे नोंदविला निषेध
By admin | Published: March 24, 2017 04:12 AM2017-03-24T04:12:05+5:302017-03-24T04:12:05+5:30
डॉक्टरांना झालेली मारहाण व त्या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ तळेगाव शहर व परिसरातील सर्व हॉस्पिटल व दवाखाने गुरुवारपासून बंद
तळेगाव दाभाडे : डॉक्टरांना झालेली मारहाण व त्या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ तळेगाव शहर व परिसरातील सर्व हॉस्पिटल व दवाखाने गुरुवारपासून बंद ठेवून निषेध नोंदविण्यात आला. मावळ डॉक्टर्स असोसिएशन (एमडीए) व इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) यांच्या पुढाकाराने येथील मायमर मेडिकल कॉलेजपासून गुरुवारी संध्याकाळी मूक मोर्चास सुरूवात झाली.
या मोर्चात एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. श्री.भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयातील निवासी डॉक्टर व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चात आयएमएचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय गोपाळघरे, एमडीएचे अध्यक्ष डॉ. दिलीप भोगे, मायमर मेडिकलच्या डॉ. सुचित्रा नागरे, ज्येष्ठ डॉ. अशोक निकम, डॉ. शाळीग्राम भंडारी, डॉ.सत्यजित वाढोकर, डॉ. शशिकांत पवार, डॉ. अरुण सोनवणे, डॉ. यशवंत वाघमारे, डॉ.रोहन पाटील, डॉ. मेघा सोनवणे, डॉ. प्रद्युम्न ढाकेफळकर, डॉ. नीलेश नारखेडे यांच्यासह डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा स्टेशन भागातील यशवंतरावनगर विभागात काढण्यात आला. नंतर या मोर्चाचे रूपांतर मायमर मेडिकल कॉलेजच्या प्रांगणात जाहीर सभेत झाले.
या वेळी शांततेचे प्रतीक म्हणून सहभागी डॉक्टर व विद्यार्थी यांनी मेणबत्त्या पेटवून ‘सेव्ह डॉक्टर’चा संदेश दिला.
डॉ. भोगे यांनी मोर्चाचा उद्देश विशद केला, डॉ. रोहन पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ.गोपाळघरे यांनी सर्व डॉक्टर व संस्थांचे आभार मानले. (वार्ताहर)