प्रकल्पग्रस्तांची अडवणूक? सोमाटणे : कचराकुंडीस विरोध केल्याने पाणीपुरवठा बंद केल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 03:10 AM2017-08-08T03:10:02+5:302017-08-08T03:10:18+5:30
सोमाटणे येथील पवना धरणग्रस्तातील पुनर्वसन झालेल्या नागरिकांना सोमाटणे ग्रामपंचायतीकडून जाणुनबुजून त्रास दिला जात असल्याचा आणि प्रशासनाकडून कारवाई करण्याचे केवळ आश्वासन दिले जात असल्याचा आरोप केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वडगाव मावळ : सोमाटणे येथील पवना धरणग्रस्तातील पुनर्वसन झालेल्या नागरिकांना सोमाटणे ग्रामपंचायतीकडून जाणुनबुजून त्रास दिला जात असल्याचा आणि प्रशासनाकडून कारवाई करण्याचे केवळ आश्वासन दिले जात असल्याचा आरोप केला जात आहे.
सन १९६५ मध्ये पवना धरणाचे बांधकाम सुरू झाले. त्या वेळी पवना धरण परिसरातील १९ गावे व वाड्या-वस्त्या आणि १२०३ खातेदार विस्थापित झाले. त्यांपैकी ३४० खातेदारांचे पुनर्वसन झाले आहे. ८६३ खातेदार अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. काही नागरिकांचे पुनर्वसन आंबी, चाकण, शिंदे वासुली, नवलाख उंब्रे या ठिकाणी करण्यात आले. काही नागरिकांना वसाहतीसाठी (घरासाठी) तीन-तीन गुंठे जागा शासनाकडून देण्यात आली. त्यानंतर सोमाटणे फाटा येथे काही नागरिकांना जागा देण्यात आली. परंतु अजूनही त्यांच्या पदरी निराशाच आहे.
सोमाटणे येथील वसाहतीमध्ये सध्या ४० कुटुंबे वास्तव्यास आहेत. परंतु सोमाटणे ग्रामपंचायतीच्या वतीने या कुटुंबांना जाणूनबुजून त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या नागरिकांची वसाहत सोमाटणेच्या गायरान हद्दीत येत असल्याने या नागरिकांना त्रास दिल्यास ते जागा सोडून जातील व हे गायरान पुन्हा ग्रामपंचायतीला मिळेल या हेतूने सरपंच, सदस्य व ग्रामसेवकांनी या ठिकाणी कचराकुंडी तयार केली आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. परिसरातील लहान मुलांपासून ते प्रौढ नागरिक, आजाराने ग्रस्त महिलांनी कचºयाच्या गाड्या अडवल्या होत्या. त्यानंतर उपसरपंचांनीमहिलांना शिवीगाळ करून दमदाटी केली.
पाणीपुरवठा पाच ते सहा दिवसांपासून बंद
या वसाहतीमधील पाणीपुरवठा गेल्या पाच ते सहा दिवसांपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत नागरिकांनी मावळ तहसील कार्यालयात निवेदन दिले आहे. परंतु कार्यालयातूनही त्यांना फक्त आश्वासन मिळत आहे. त्यानंतर पवना धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मुकुंद काऊर व पदाधिकाºयांनी प्रांत सुभाष बागडे व तहसीलदार रणजीत देसाई यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर लगेचच त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. हा विषय प्रांत कार्यालयापर्यंत पोहोचल्याने ग्रामपंचायतीने त्यांना त्रास देणे सुरू केले आहे. गेल्या आठवड्यापासून या नागरिकांचे पाणी बंद करण्यात आहे.
ही जागा पूर्वी गायरान असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून या जागेत ग्रामपंचायत कचरा टाकत आहे. धरणग्रस्तांचे पुनर्वसन झाल्यानंतर या नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून कचराकुंडीच्या परिसरात पत्राशेड उभारण्यात आले आहे. या परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे.
कचराकुंडी परिसरातही लोकवस्ती वाढली आहे. ग्रामपंचायतीला
पर्यायी जागा मिळत नसल्याने आता कचरा तेथे टाकण्यात येत आहे.
जागा मिळाल्यास कचराकुंडी बंद करण्यात येईल. ग्रामस्थांनी या कचराकुंडीला विरोध केला आहे, म्हणून त्यांचे पाणी बंद केले हे चुकीचे आहे. त्या भागातील वाहिनी काही दिवसांपासून नादुरुस्त असल्याने पाणीपुरवठा होत नाही. वाहिनी दुरुस्त करून त्वरित पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल.
- नलिनी गायकवाड,
सरपंच, सोमाटणे
कारवाई करणार
शासनाकडून धरणग्रस्तांना न्याय मिळाला नाही. पुनर्वसनस्थळी नागरिक स्थानिक-बाहेरचा असा वाद निर्माण करून त्रास देण्याचा प्रयत्न होतो. धरणासाठी जमीन देणाºयांच्या पदरी ५० वर्षे पूर्ण झाले तरी उपेक्षाच पडली आहे. याबाबत प्रांताधिकारी सुभाष बागडे म्हणाले, की या नागरिकांचे पुनर्वसन आम्ही सरकारी जागेत केले आहे. ग्रामपंचायत पातळीवरून या नागरिकांना त्रास होत असेल, तर ग्रामपंचायतीने अनधिकृत जागेत ग्रामपंचायतीचे कार्यालय बांधले असून, त्यांच्यावर शासकीय नियमाने दंडात्मक कारवाई केली जाईल.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
गेल्या अनेक दिवसांपासून या नागरिकांना ग्रामपंचायतीकडून त्रास होत आहे; परंतु येथील लोकप्रतिनिधींकडे अनेकदा निवदने देण्यात आली आहेत. परंतु त्यांच्याकडून याची दखल घेतली जात नसल्याचे नागरिक बोलत आहेत.