फ्लेक्सबाजीला प्रोत्साहन; अधिका-यांची चौकशी, महापौरांचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 01:00 AM2018-03-03T01:00:15+5:302018-03-03T01:00:15+5:30
अनधिकृत फ्लेक्स काढणा-या भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांना ठेकेदाराने खंडणी मागणे आणि जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले.
पिंपरी : अनधिकृत फ्लेक्स काढणा-या भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांना ठेकेदाराने खंडणी मागणे आणि जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. ‘गुंडगिरी करणा-या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, अनधिकृत फ्लेक्स उभारणाºयांस प्रोत्साहन देणा-या अधिका-यांवर कारवाई करावी, त्यांची चौकशी करावी’ असा आदेश महापौर नितीन काळजे यांनी प्रशासनास दिला आहे.
महापालिका परिसरातील अनधिकृत फ्लेक्सविरोधात सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांकडून आवाज उठविला जात आहे. सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी स्वत: अनधिकृत फ्लेक्स काढण्याची मोहीम उघडली होती.
त्यामुळे संतापलेल्या ठेकेदाराने कामठे यांना जिवे मारण्याची धमकी दिली. या विषयावर बोलताना भाऊसाहेब भोईर म्हणाले, ‘‘नगरसेवक कोणत्याही पक्षाचा असो; त्याला कोणी दमबाजी करीत असेल तर ते चुकीचे आहे. अशा मुजोर ठेकेदारांवर त्वरित कारवाई करावी, माज असणाºया ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे.’’
दत्ता साने म्हणाले, की यापूर्वीही एका ठेकेदाराने असाच दम एका नगरसेवकास दिला होता. नगरसेवकांना कोणी धमकी देत असेल, तर ते प्रशासनाने गांभीर्याने घ्यावे. धमकी देणाºयांचा तुम्ही बंदोबस्त करणार नसाल, तर वेळ पडल्यास आम्ही करू.
सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘फ्लेक्समुळे शहर बकाल होत आहे. नगरसेवकाला धमकी देण्यापर्यंत मुजोरी वाढली आहे. अशा ठेकेदाराला काम देऊ नये. त्याची मस्ती उतरविली जाईल. प्रशासनाने त्याची मालमत्ता जप्त करावी.’’
>ठेकेदाराला काळ्या यादीत टाका
शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, ‘‘फ्लेक्स संदर्भात सारथीवर आणि आमच्याकडेही तक्रारी येतात. त्यांची दखल घेतली जात नाही. अशा लोकांना कोण अधिकारी पाठीशी घालतेय याचा शोध घ्यायला हवा. किती फ्लेक्सला परवानगी दिली आहे आणि किती फ्लेक्स विनापरवाना आहेत, याचेही आॅडिट करावे. नगरसेवकांना धमकी देणाºयांना काळ्या यादीत टाकावे.’’
महापौर नितीन काळजे यांनी, संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करावा, तसेच या प्रकरणाची आणि संबंधित अधिकाºयांची चौकशी करावी, असा आदेश प्रशासनास दिला.
अधिकाºयांचे अभय
तुषार कामठे म्हणाले, ‘‘सप्टेंबर महिन्यापासून फ्लेक्ससंदर्भात मी महापालिकेकडे तक्रार करीत आहे. प्रशासनाकडे माहितीही मागितली. बीट निरीक्षकांकडे तक्रारही केली. संबंधित विभागाच्या अधिकाºयालाही सांगितले. मात्र, दखल घेतली नाही. दखल न घेतल्याने आंदोलन केले होते.’’