प्रचारात सैराट, शांताबाई गाण्याची धूम
By Admin | Published: February 20, 2017 02:54 AM2017-02-20T02:54:48+5:302017-02-20T02:54:48+5:30
झिंग झिंग झिंगाट, शांताबाई, बाई वाड्यावर या, आवाज वाढव डीजे, तुला आईची शपत हाय ! यांसह अनेक चित्रपट व लोकगीतांच्या
रहाटणी : झिंग झिंग झिंगाट, शांताबाई, बाई वाड्यावर या, आवाज वाढव डीजे, तुला आईची शपत हाय ! यांसह अनेक चित्रपट व लोकगीतांच्या चालीवरील निवडणूक प्रचाराची गाणी शहरवासीयांच्या कानावर आदळत आहेत. प्रचाराच्या रणधुमाळीत याच गाण्यांची क्रेझ अधिक होती. प्रचार थंडावताच कर्णकर्कश आवाजाच्या त्रासातून मुक्ती मिळाल्याने मतदारांनी नि:श्वास सोडला.
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच उमेदवारांनी प्रचारासाठी स्वत:च्या आवाजाचे रेकॉर्डिंग केलेली माहिती एलईडी स्क्रीनवर दाखविण्यासाठी खास वाहनांची व्यवस्था केली होती. शांताबाई, झिंगाट, बाई वाड्यावर या, वाट बघतोय रिक्षावाला यासह अनेक गाण्यांच्या चालीवर त्यांनी स्वत:ची महती व्यक्त करणारी गीते रेकॉर्डिंग केली होती.
दहा दिवसांपासून शहरात निवडणुकीचे वारे जोरात वाहत होते. अगदी सकाळपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत निवडणुकीचे कार्यकर्ते प्रचार करीत होते. आॅटो रिक्षा ,जीप या वाहनांवर स्पीकर लावून उमेदवारांची माहिती दिली जात होती. गल्लीबोळात चकरा मारणाऱ्या रिक्षांमुळे शांतता भंग झाला होता. शाळेतील विद्यार्थ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागला. (प्रतिनिधी)
नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत
मुख्य रस्ते, अनेक मुख्य चौक या ठिकाणी एलईडी व्हॅन, टेम्पो, रिक्षा यांच्या माध्यमातून तर पथनाट्याच्या माध्यमातून प्रचार करण्यात येत होता. अनेक वेळा एखादी एलईडी व्हॅन एका चौकात लावली की, तासन्तास एकाची ठिकाणी उभी असे. त्यामुळे चौकातील व्यावसायिक व त्या परिसरातील नागरिक नाराजी व्यक्त करीत होते. गाण्यांच्या कर्णकर्कश आवाजाने गेल्या काही दिवसांपासून नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील अनेक दिवसांपासून सुरूअसलेल्या प्रचाराच्या रणधुमाळीमुळे नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला. अखेर नागरिकांनी रविवारी सुटकेचा नि:श्वास सोडला.