प्रस्ताव दिल्यास तातडीने मंजुरी, पवना, मुळा व इंद्रायणी नदीसुधारला मिळणार गती, नितीन गडकरी यांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 02:28 AM2017-09-09T02:28:00+5:302017-09-09T02:28:02+5:30
पिंपरी-चिंचवडमधील पवना, मुळा आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला गती देणार असून याबाबतचा प्रस्ताव तातडीने पाठवा, त्यास मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी महापालिकेच्या शिष्टमंडळास दिले आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील पवना, मुळा आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला गती देणार असून याबाबतचा प्रस्ताव तातडीने पाठवा, त्यास मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी महापालिकेच्या शिष्टमंडळास दिले आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पास गती मिळणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील पवना सुधारच्या सहाशे कोटींच्या प्रकल्पास गती मिळणार आहे.
राजकीय इच्छाशक्ती नसल्याने पिंपरी-चिंचवडमधील नदीसुधार विषय आजवर कागदावरच राहिला आहे. शहरातील औद्योगिक परिसरातील सांडपाणी प्रक्रिया न करताच नदीत सोडले जाते. शहरामध्ये छोटे-मोठे सुमारे साडेसहा हजार उद्योग आहेत. तसेच हजारो लघुउद्योग सुरू आहेत. जलनिस्सारण अर्थात एसटीपी प्लांट उभारूनही केवळ ८० टक्केच पाणी प्रक्रिया केले जाते. उर्वरित पाणी तसेच नदीत सोडले जाते. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत नदीप्रदूषणाचे प्रमाण वाढतच आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नितीन गडकरी यांना नदीसुधार आणि गंगा नदीसुधार ह्या ही खात्यांची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या जवळच्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीस गती मिळेल, अशी आशा महापालिकेतील भाजपाच्या सत्ताधाºयांना होती. त्यामुळे नदीसुधारला गती मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत होता. याबाबत ‘लोकमत’ने शुक्रवारच्या अंकात ‘नदीसुधारला गती मिळणार का? असे वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल केंद्रीय मंत्री गडकरी यांनी घेतली असून हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. कासारवाडी येथील सीआयआरटीच्या कार्यक्रमास गडकरी उपस्थित होते. या वेळी पदाधिकारी आणि त्यांच्यात चर्चा झाली. या वेळी महापौर नितीन काळजे, आमदार लक्ष्मण जगताप, पक्षनेते एकनाथ पवार आदी उपस्थित होते.
पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘शहरातील अनेक प्रश्नांबाबत आम्ही मंत्री महोदयांशी चर्चा केली. नदीसुधार प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला आहे. त्यास चालना द्यावी, अशी मागणी केली. त्यावर इंद्रायणी आणि पवना नदी सुधारविषयी सकारात्मक चर्चा झाली. नदीसुधारला गती देणार असल्याचे सांगितले. याविषयी महापालिकेने प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना प्रशासनास केली.’’