उद्योगनगरीतील हॉटेलवर कारवाईची टांगती तलवार?

By admin | Published: April 1, 2017 02:12 AM2017-04-01T02:12:43+5:302017-04-01T02:12:43+5:30

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर ५०० मीटरच्या परिसरात दारूविक्रीवर बंदी घालण्याच्या आपल्या आदेशात सर्वोच्च

Prosecuting sword in a commercial hotel? | उद्योगनगरीतील हॉटेलवर कारवाईची टांगती तलवार?

उद्योगनगरीतील हॉटेलवर कारवाईची टांगती तलवार?

Next

पिंपरी : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर ५०० मीटरच्या परिसरात दारूविक्रीवर बंदी घालण्याच्या आपल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी बदल करून २० हजार किंवा त्यापेक्षा कमी लोकसंख्येच्या भागात २२० मीटरपर्यंतच दारूविक्रीवर बंदी घातली आहे. तर, २० हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या परिसरात ५०० मीटरमध्ये दारू विकता येणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या २१ लाखांच्या पुढे असल्याने शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या तिन्ही महामार्गांलगतच्या ५०० मीटर अंतरावरील हॉटेलवरील टांगती तलवार कायम आहे.
अपघाताचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी महामार्गालगत ५०० मीटरच्या आतील दारू दुकाने, परमिटरूम, बिअरबार बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. दरम्यान, शुक्रवारी पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात बदल करीत २० हजार किंवा त्यापेक्षा कमी लोकसंख्येच्या भागात २२० मीटरपर्यंतच्या अंतरावरच दारूविक्रीवर बंदी असेल, असे सुधारित आदेशात म्हटले आहे. मात्र, २० हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या परिसरात ५०० मीटरमध्ये दारू विकता येणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
त्यामुळे २१ लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या पिंपरी-चिंचवड हद्दीतून जाणाऱ्या
तीन महामार्गांलगतच्या हॉटेलवरही टांगती तलवार कायम आहे.
जुना मुंबई-पुणे महामार्ग पिंपरी-चिंचवड हद्दीतून जातो. तसेच नाशिक-पुणे महामार्ग आणि
पुणे- बंगळुरू हे महामार्गही या हद्दीतून जातात. निगडी ते दापोडी या जुना मुंबई-पुणे महामार्गावर सुमारे ३०० हॉटेल आहेत.
कासारवाडी येथून जाणाऱ्या नाशिक महामार्गाला लागून असलेल्या कासारवाडी, भोसरी परिसरात शंभराहून अधिक हॉटेल आहेत. त्याचबरोबर पुणे-बंगळुरू हा मार्ग शहराच्या बाहेरील बाजूने जातो. या मार्गावर वाकड, ताथवडे, रावेत, किवळे येथील हॉटेल येतात. त्याचबरोबर ५०० मीटरच्या हद्दीत थेरगाव, काळेवाडीतील काही हॉटेल येतात. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ही हॉटेल बंद करावी लागणार आहेत.
या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड हद्दीतील परमिट रूम, मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याची वेळ येणार आहे. ५०० मीटर अंतरावर येणारी सुमारे ९०० हॉटेल असून या हॉटेल व्यावसायिकांची धावपळ सुरू
झाली आहे. काही व्यावसायिकांनी स्थलांतर करण्याचा विचार सुरू
केला आहे. तर इतरांनी हॉटेलमधील दारूविक्री बंद करण्याविषयी विचार केला आहे. (प्रतिनिधी)


द्रुतगतीवरील काही व्यावसायिकांना दिलासा
१  - लोणावळा : राष्ट्रीय व राज्य महामार्गावर ५०० मीटरच्या परिसरात दारूविक्रीवर बंदी घालण्याच्या आपल्या आदेशात आज सर्वोच्च न्यायालयाने बदल केल्याने ग्रामीण भागात व्यावसाय करणाऱ्या शेकडो हाँटेल व ढाबे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
२ - हायवे वरील दारूबंदीच्या आदेशात बदल करताना सरन्यायाधीश जे.एस.खेहर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने २० हजार किंवा त्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या भागात हे अंतर २२० मीटर केले आहे. मावळ तालुक्यात लोणावळा ते देहूरोडदरम्यानच्या अनेक व्यावसायिकांना या सुधारित आदेशाने दिलासा मिळाला आहे. लोणावळा, वडगाव, तळेगाव व देहूरोड या चार शहरांची लोकसंख्या २० हजारांपेक्षा अधिक आहे.
३ - उर्वरित ग्रामीण भागात गावांची लोकसंख्या २० हजारांपेक्षा कमी असल्याने शहरी भाग वगळता उर्वरित परिसरात हायवे पासून केवळ २२० मीटर अंतरावर दारूविक्री करता येणार आहे. लोणावळा खंडाळा हे देहूरोडदरम्यान रस्त्यांच्या दुर्तफा मोठ्या प्रमाणात हाँटेल व ढाबे आहेत. त्यांपैकी काही जणांकडे अधिकृत परमिटचे लायसन्स आहेत, तर अनेक जण स्थानिकप्रशासनाच्या कृपाशीर्वादाने दारूविक्री करतात. या सर्वांनाच सुधारित आदेशाने दिलासा मिळाला आहे.
४ - शहरी भागातील दुकाने व हाँटेल व्यावसायिकांना मात्र आपला व्यावसाय राष्ट्रीय व राज्य महामागार्पासून ५०० मीटर दूर अथवा ग्रामीण भागात हलवावा लागणार आहे. शहरी भागात शहराची लोकसंख्या २० हजारांपेक्षा जास्त असली तरीदेखील एका ठराविक भागाची लोकसंख्या २० हजार एवढी नसल्याने या आदेशातून पळवाटा काढत शहरी भागातदेखील २२० मीटर अंतरावर दारूविक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Prosecuting sword in a commercial hotel?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.