उद्योजक घेताहेत राजाश्रय, ठेकेदारांच्या दहशतीमुळे छोट्या व्यावसायिकांनी निवडला पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 01:46 AM2018-11-07T01:46:04+5:302018-11-07T01:46:31+5:30
कंपनीतील विविध कामांचा ठेका कोणाला द्यायचा हे ठरविण्याचा उद्योजकांचा हक्क हिरावून घेतला जात आहे. गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती दमदाटीने कंपनीतील कामाचे ठेके स्वत: घेत आहेत.
- संजय माने
पिंपरी - कंपनीतील विविध कामांचा ठेका कोणाला द्यायचा हे ठरविण्याचा उद्योजकांचा हक्क हिरावून घेतला जात आहे. गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती दमदाटीने कंपनीतील कामाचे ठेके स्वत: घेत आहेत.
हा प्रकार सर्रासपणे पिंपरी, चिंचवड, भोसरी, चाकण, तळेगाव औद्योगिक पट्ट्यात सुरू आहे. औद्योगिक क्षेत्रातील ठेकेदारीत गुंड आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिरकाव केला आहे. त्यामुळे अशा ठेकेदारीला अप्रत्यक्षपणे राजकीय पाठिंबा मिळत असून, उद्योजक एकाकी पडू लागले आहेत. दहशतीखाली वावरणाऱ्या उद्योजकांना पोलिसांकडूनही संरक्षण मिळण्यात अडचणी येत असल्याने नाइलाजास्तव राजकीय आश्रय घ्यावा लागत आहे.
औद्योगिक क्षेत्रात गुंड प्रवृत्तीच्या आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाला आहे. कारखान्यांमधील ठेकेदारीचा कसलाही अनुभव गाठीशी नसलेले राजकीय पक्षांचे काही कार्यकर्ते नेत्यांकडे कंपन्यांमधील कंत्राट मिळावे, यासाठी आग्रह धरतात. राजकीय पक्षाचे पद धारण केले असले, तरी उत्पन्नाचे स्रोत कंपनीतील ठेकेदारीच असावे,असे राजकीय पक्षांच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वाटते.
सुरक्षित व्यवसायासाठी
राजकीय संपर्क
‘उद्योजक, व्यावसायिक म्हटले की, राजकारणापासून चार हात दूर’ असे समीकरण होते. राजकारणी कोणीही असो, त्यांच्याशी चांगले संबंध ठेवण्याची भूमिका बाळगून व्यावसायिक स्वत:हून राजकारणापासून अलिप्त राहणे पसंत करीत असतात. पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव, शिरूर या औद्योगिक पट्ट्यात मात्र अचानक चित्र बदलले आहे. अनेक उद्योजक राजकीय पक्षांच्या संपर्कात येण्याचे प्रमाण वाढले आहे. सुरक्षितपणे व्यवसाय, उद्योग करता यावा, या उद्देशाने उद्योजक राजकीय आश्रयाला येत आहेत.
नेतेमंडळींचा उद्योजकांवर दबाव
नेतेमंडळीकडून उद्योजकांवर दबाव आणून अथवा वशिलेबाजीने कंपनीतील कामाचा ठेका मिळविण्यात यशस्वी झालेले अनेक ठेकेदार औद्योगिक पट्ट्यात कार्यरत आहेत. गुंड ठेकेदार आणि राजकीय दबावतंत्राच्या अवलंबाने ठेकेदारीत शिरकाव केलेल्यांमध्ये ठेका मिळविण्यावरून वादंगाचे प्रकार घडू लागले आहेत. कंपनी मालकाला (उद्योजक) स्वत:च्या मर्जीने ठेकेदार नेमण्याचा अधिकार वापरता येत नाही. उद्योजकाने एखादा ठेकेदार नेमल्यास तो ठेकेदार काम कसे करतो, ते पाहतो, मालवाहू वाहने पुरविण्याचा ठेका इतर कोणी घेतल्यास त्या वाहनांच्या काचा फोडणे, वाहनांचे नुकसान करून ठेकेदाराला पळून लावण्यापर्यंतचे प्रकार औद्योगिक पट्ट्यात घडत आहेत. कामगार पुरविण्याचा ठेका उद्योजकाने दुसºया कोणाला दिला असल्यास त्या ठेकेदाराच्या कामगारांना कंपनीत जाण्यास मज्जाव केला जातो.
दादागिरीपुढे
उद्योजक हतबल
उद्योजकांनी दादागिरी करणाºया ठेकेदारांची पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला, तर राजकीय नेत्यांकडून पोलीस अधिकाºयाची समजूत काढली जाते. गुंडगिरी करणाºया स्थानिक ठेकेदारांविरुद्ध तक्रार करायची, तर कारखान्याचे नुकसान केले जाण्याची भीती असते. त्यामुळे पोलिसांकडे तक्रार करण्यास उद्योजक तयार होत नाहीत. कोणाचीही तक्रार केली, तरी राजकीय नेते, पुढाºयांचा हस्तक्षेप होत असल्याचे कटू अनुभव उद्योजकांना आले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षाशी संलग्न राहणे हाच सुरक्षित उद्योग, व्यवसाय करण्याचा पर्याय असल्याचे लक्षात आल्याने हतबल उद्योजक राजकीय आश्रय घेत आहेत.