Pimpri Chinchwad: वाकडमध्ये स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाने वेश्या व्यवसाय; तिघींची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 11:53 AM2024-04-11T11:53:17+5:302024-04-11T11:53:46+5:30
पिंपरी : स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करून पोलिसांनी पीडित तीन महिलांची सुटका केली. पिंपरी-चिंचवड ...
पिंपरी : स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करून पोलिसांनी पीडित तीन महिलांची सुटका केली. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने वाकड येथे प्रेस्टिंग स्क्वेअर मॉलमधील द रीज स्पा या मसाज पार्लरमध्ये सोमवारी (दि. ८) रात्री दहाच्या सुमारास ही कारवाई केली.
उमेश ऊर्फ अनिकेत इंद्रजित दुबे (वय ३८, रा. बाणेर, पुणे. मूळ रा. देवरा, लावरी, ता. माऊ. जि. चित्रकुट, उत्तर प्रदेश) याला याप्रकरणी अटक केली. त्याच्यासह स्पा सेंटरची चालक-मालक महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथे प्रेस्टिंग स्क्वेअर मॉलमधील द रीज स्पा या मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षच्या पथकाने स्पा सेंटरवर छापा मारून कारवाई केली. यात तीन महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी भाग पाडले असल्याचे समोर आले. या पीडित तीन महिलांची पोलिसांनी सुटका केली. तसेच स्पा सेंटरचा मॅनेजर उमेश दुबे याला अटक करून १२ हजार २० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलिस अंमलदार सुनील शिरसाट, मारुती करचुंडे, भगवंता मुठे, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, सोनाली माने यांच्या पथकाने ही कामगिरी केली.