स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका
By नारायण बडगुजर | Updated: May 22, 2024 18:22 IST2024-05-22T18:22:19+5:302024-05-22T18:22:38+5:30
आरोपी हे स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली

स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका
पिंपरी : स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करून पोलिसांनी पीडित दोन महिलांची सुटका केली. तसेच स्पा मॅनेजरला अटक केली. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पिंपळे सौदागर येथे शिवार चौकातील रेनबो प्लाझा येथील ॲपल ब्युटी सलून अँड स्पावर सोमवारी (दि. २०) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास ही कारवाई केली.
अक्षय धनराज पाटील (२४, रा. शिवार चौक, पिंपळे सौदागर) असे अटक केलेल्या स्पा मॅनेजरचे नाव आहे. त्याच्यासह स्पा चालक मालक रोहन विलास समुद्रे (३५, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी), भूषण पाटील (३०, रा. रहाटणी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित हे स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली. संशयित हे दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. याबाबत कारवाई करून पोलिसांनी दोन महिलांची सुटका करत स्पा मॅनेजरला अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक पद्मभूषण गायकवाड तपास करीत आहेत.