परदेशातील भारतीयांना संरक्षण द्या
By Admin | Published: March 21, 2017 05:12 AM2017-03-21T05:12:34+5:302017-03-21T05:12:34+5:30
अमेरिकेमध्ये औद्योगिक व्यवसाय व आय.टी. क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या व अमेरिकेत व्यवसाय करीत असलेल्या
पिंपरी : अमेरिकेमध्ये औद्योगिक व्यवसाय व आय.टी. क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या व अमेरिकेत व्यवसाय करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी भारत सरकार कडून कोणते धोरण राबविले जात आहे, असा तारांकित प्रश्न खासदार श्रीरंग बारणे यांनी आज लोकसभेत उपस्थित केला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची नियुक्ती झाल्यापासून वंशाने भारतीय नागरिक असलेल्या व अमेरिकेत व्यवसाय करीत असलेल्या नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून अनेक अडचणी निर्माण झाल्या असल्याचे सोशल मिडीयावर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांवरून समजते. याच अनुशंघाने खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेमध्ये तारांकित प्रश्न विचारला.
बारणे म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून २०१६ मध्ये अमेरिका दौऱ्यादरम्यान तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत आण्विक उर्जा, संरक्षण आणि सुरक्षा अशा विषयांवर दोन्ही देशामध्ये चांगले संबंध प्रस्थापित केले होते. परंतु अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी डोनाल्ड ट्रम्प यांची नियुक्ती झाल्यानंतर अमेरिकेमध्ये औद्योगिक व्यवसाय करणाऱ्या भारतीय नागरिकांच्या व्यवसायावर याचा असर पडत असून या मुळच्या भारतीय नागरिकांना आपले व्यवसाय वाचविण्याचे मोठे आव्हान असल्याचे मागील काही दिवसांपासून मिडीयाच्या माध्यमातून प्रसिद्ध होत आहे.
याच काळात काही भारतीयांवर अमेरिकेत हल्ले करण्यात आले होते त्यामुळे अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी व आय.टी. क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांसाठी भारत सरकार कडून कोणते धोरण राबविले जात आहे, असा प्रश्न बारणे यांनी निर्मला सीतारमण यांच्यासमोर लोकसभेत उपस्थित केला. (प्रतिनिधी)