महापालिकेच्या ‘पे अँड पार्किंग’च्या ठरावाची होळी; आकुर्डीत अपना वतन संघटनेतर्फे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 06:52 PM2021-07-31T18:52:47+5:302021-07-31T18:55:13+5:30
आकुर्डी येथील कार्यालयावर ‘पे अँड पार्किंग’च्या प्रस्तावाची होळी करून निषेध व्यक्त
पिंपरी : वाहतुकीला शिस्त लावण्याच्या नावाखाली पिंपरी -चिंचवड शहरामध्ये केवळ महसूल गोळा करण्यासाठी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी ‘पे अँड पार्किंग’ धोरण लागू केले. या धोरणाच्या ठरावाच्या प्रतींची होळी करण्यात आली. आकुर्डी येथे शनिवारी आंदोलन झाले.
‘पे अँड पार्किंग’ धोरणच्या विरोधात अपना वतन संघटनेने सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांना तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला आहे. सर्वसामान्य जनतेच्या भावना राजकीय पक्षांच्या जबाबदार लोकप्रतिनिधीं समोर मांडण्याचा व ‘पे अँड पार्किंग’ धोरण चुकीचे आहे हे सांगण्यासाठी त्यांच्या स्थानिक कार्यालयावर आंदोलने सुरु केली आहेत. याचाच एक भाग म्हणून संघटनेच्या वतीने शनिवारी सकाळी महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्या आकुर्डी येथील कार्यालयावर ‘पे अँड पार्किंग’च्या प्रस्तावाची होळी करून निषेध व्यक्त केला. नागरिकांनी पे अँड पार्कींग चा प्रस्ताव जाळून, पे अँड पार्किंग रद्द करा, पे अँड पार्किंगच्या माध्यमातून होणारी पिळवणूक थांबवा, अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या.
महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख, शहर कार्याध्यक्ष हमीद शेख, महिलाध्यक्ष राजश्री शिरवळकर, संघटक निर्मला डांगे, तसेच दीपक खैरनार, नॅशनल ब्लॅक पँथरच्या संगीता शहा, तौफिक पठाण, छावा मराठा युवा महासंघाचे धनाजी येळकर पाटील, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, सालार शेख, इमाम नदाफ, सुधीर वाळके, संकल्प फाउंडेशनचे गणेश जगताप, केशव बुडगल, लक्ष्मण पांचाळ उपस्थित होते.
मिसाळ म्हणाले, ‘पे अँड पार्किंग’ धोरणाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विरोध करणार आहे. हे धाेरण चुकीचे असून ते रद्द झाले पाहिजे.
सिद्दीक शेख म्हणाले, शहराच्या विकास आराखड्यामध्ये वाहनतळाची आरक्षित जागा ताब्यात घेऊन त्याचा वापर करावा. रस्त्याच्या कामासाठी अनेक नागरिकांना बेघर करून त्या जागेवर पे अँड पार्किंग करणे योग्य नाही.