टीव्हीवर ‘हर हर महादेव’ चित्रपट दाखविल्यास आंदोलन; संभाजी ब्रिगेडचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 04:32 PM2022-12-05T16:32:18+5:302022-12-05T16:32:41+5:30
चित्रपटाविरोधात देशात, राज्यात शिवप्रेमींनी तीव्र आंदोलन करत नापसंती व्यक्त केली
पिंपरी : ‘हर हर महादेव’ हा चित्रपट एका वाहिनीवर दाखविण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाविरोधात देशात, राज्यात शिवप्रेमींनी तीव्र आंदोलन करत नापसंती व्यक्त केली आहे. तरीही संबंधित चॅनेलने हा चित्रपट दाखविल्यास त्यांच्या मुख्य कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. चित्रपटामध्ये वादग्रस्त संदर्भ दाखविण्यात आले आहेत. यावरून राज्यासह देशभरातील शिवप्रेमींमध्ये चित्रपटाविषयी रोष निर्माण झाला आहे. या चित्रपटाचे ‘शो’ दाखवू नयेत, यासाठी संभाजी ब्रिगेडने टोकाचा विरोध केला.
राज्यभरातील चित्रपटगृहातील ‘शो’ बंद केले. त्यानंतर राज्यातील चित्रपटगृहांमध्ये ‘शो’ न दाखविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर संबंधित वाहिनीने ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा ‘शो’ १८ डिसेंबर रोजी दाखविणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे राज्यभरातील शिवप्रेमींच्या भावना पुन्हा दुखावू शकतात, त्यामुळे संबंधित वाहिनीने हा चित्रपट दाखवू नये, अशी मागणी निवेदनातून केली आहे.