आळंदी रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालय दर्जा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 11:54 PM2018-11-14T23:54:57+5:302018-11-14T23:55:29+5:30
रुपाली काळे : नागरिकांना मिळेना सुविधा
आळंदी : आळंदी ग्रामीण रुग्णालयास अनेक समस्यांनी घेरले असून भाविक, नागरिकांना आरोग्यदायी प्रभावी सुविधांसाठी आळंदी ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्या रुपाली काळे यांनी केली आहे. या संदर्भात आळंदी ग्रामीण रुग्णालयास अचानक भेट देऊन कुरुळी मरकळ जिल्हा परिषद गटातील नागरिक आणि भाविक यांना उत्तम दर्जाची आरोग्यसेवा देण्याची मागणी केली. आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक जी. जी. जाधव यांचे समवेत त्यांनी संवाद साधला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबासाहेब ठाकूर आदी उपस्थित होते. आळंदी नगरपरिषदेने आळंदी ग्रामीण रुग्णालयास ५० गुंठे जागा कराराने दिली आहे. या जागेत आळंदी ग्रामीण रुग्णालय विकसित करण्यात आले आहे. मात्र, अनेक आरोग्यदायी सेवासुविधांपासून रुग्णालय वंचित असल्याचे या पाहणी दौऱ्यात निदर्शनात आल्याचे त्यांनी सांगितले. यात येथील रुग्णालयाच्या प्रांगणात आळंदी नगरपरिषदच्या वाहनांसह इतर खासगी बेकायदेशीर वाहन पार्किंग, भाजी विक्रेत्यांचा रुग्णसेवेत अडथळा, अत्याधुनिक जनरेटर सेवेचा अभाव, औषध भांडारसाठी स्वतंत्र कक्षाचा अभाव, एक्स्प्रेस फिडर सुविधेचा अभाव, शवविच्छेदन कक्षाचा अभाव आदी समस्या कायम आहेत. यासाठी काळे यांनी सुसंवाद साधत अडीअडचणी जाणून घेतल्या. या मागण्यांसाठी काळे यांनी थेट माजी मुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष घालण्यास साकडे घातले आहे.
आळंदी हे राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने आळंदी ग्रामीण रुग्णालयास सेवासुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. येथील भाविक व नागरिक तसेच कुरुळी मरकळ जिल्हा परिषद गटातील नागरिकांच्या आरोग्याचे सेवेसाठी या रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा वाढ खास बाब म्हणून देण्याची मागणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.