PSI ला ‘मेफेड्रोन’मुळे कोट्याधीश होण्याची झिंग, सापडलेल्या ड्रग्जची विक्री करताना जाळ्यात
By नारायण बडगुजर | Published: March 2, 2024 06:03 PM2024-03-02T18:03:50+5:302024-03-02T18:04:49+5:30
आरोपी पोलिसाकडून ४५ कोटी रुपयांचे ४५ किलो मेफेड्रोन जप्त केले. या कारवाईमुळे पोलिस दलासह राज्यभर खळबळ उडाली...
पिंपरी : झटपट कोट्याधीश होण्यासाठी पिंपरी- चिंचवड पोलिस दलातील एका पोलिस उपनिरीक्षकाने चक्क सापडलेले मेफेड्रोन विक्रीचा प्लॅन केला. मात्र, तो पोलिसांच्याच जाळ्यात अडकला. त्याला ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्याच्याकडून ४५ कोटी रुपयांचे ४५ किलो मेफेड्रोन जप्त केले. या कारवाईमुळे पोलिस दलासह राज्यभर खळबळ उडाली.
विकास शेळके (नेमणूक - निगडी पोलिस ठाणे), असे अटक केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. नमामी शंकर झा (३२, रा. निगडी. मूळ रा. बिहार) याला सुरुवातीला अटक केली. याप्रकरणी पोलिस अंमलदार विजय मोरे यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक संशयित विशालनगर परिसरात मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सांगवी पोलिस ठाण्यातील अंमलदार विवेक गायकवाड यांना मिळाली. सांगवी पोलिसांनी सापळा रचून नमामी झा याला दोन किलो मेफेड्रोनसह ताब्यात घेतले. उपनिरीक्षक विकास शेळके याने हे ड्रग्स त्याच्याकडे दिल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी शेळके याच्याकडून ४५ कोटी रुपये किंमतीचे ४५ किलो मेफेड्रोन जप्त केले.
कोट्यवधीचे मेफेड्रोन रस्त्यावर
मागील महिन्यात २६ फेब्रुवारी रोजी रात्री एका गाडीतून मेफेड्रोन असलेले पोते रस्त्यावर पडले. त्यावेळी कारचालक ईश्वर मोटे यांनी ते पोते उघडून पाहिले असता पोत्यात काळसर रंगाचा पदार्थ त्यांना दिसला. कोणत्यातरी कंपनीचा कच्चामाल असल्याचा त्यांचा समज झाला. त्यांनी नाकाबंदीतील पोलिस अंमलदार सुधीर ढवळे आणि अनिल चव्हाण यांच्याकडे पोते दिले. यातील ढवळे हा पोलिस उपनिरीक्षक शेळके याचा रायटर होता. त्याने याबाबत शेळके याला माहिती दिली. शेळकेने पोते लपवून ठेवण्यास सांगून कुठे याबाबत वाच्यता न करण्याची सूचना केली.
पोलिसांना टीप मिळाली अन्...
पोत्यातील ४५ कोटी रूपये किंमतीच मेफेड्रोन पाहून उपनिरीक्षक शेळके याचे डोळे फिरले. मेफेड्रोन विक्रीतून आपण कोट्याधीश होऊ, असे स्वप्न रंगवले. मेफेड्रोन विक्रीचा प्लॅन केला. रावेत परिसरातील एका गुन्हेगाराकडे नमामी झा याला पाठवले. मात्र, गुन्हेगाराने सांगवी येथील एका पोलिस कर्मचाऱ्याला याबाबत टीप दिली. संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने वरिष्ठांना सांगितले. त्यानुसार सापळा रचून झा याला ताब्यात घेतले.
कारचालकाचीही चौकशी
पोलिसांनी कारचालक ईश्वर मोटे यांना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले. त्यांनी सांगितलेल्या हकीकतनुसार पोलिसांनी पडताळणी केली असता त्यात तथ्य आढळले. सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना मिळाले. मोटे यांची काहीही चूक नसल्याचे सांगितले जात आहे.
हाॅटेलमध्ये पार्टनरशिप?
झटपट श्रीमंत होण्यासाठी उपनिरीक्षक शेळकेची धडपड सुरू होती. त्यासाठी नोकरी करण्यासोबतच तो एका हॉटेलमध्ये भागीदार झाला. नमामी झा त्याच्या हॉटेलमध्ये कामाला होता. शेळके याच्या या पार्टनरशिपबाबत पोलिसांनी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.