स्वच्छतागृहांबाबत हवी जनजागृती व स्वयंशिस्त
By admin | Published: May 26, 2016 03:38 AM2016-05-26T03:38:08+5:302016-05-26T03:38:08+5:30
‘लोकमत’ने सलग आठ दिवस स्वच्छतागृहांबाबत वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. महिला स्वच्छतागृहांचा प्रश्न प्रामुख्याने त्यामध्ये मांडण्यात आला होता. महिलांची होणारी कुचंबणा
‘लोकमत’ने सलग आठ दिवस स्वच्छतागृहांबाबत वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. महिला स्वच्छतागृहांचा प्रश्न प्रामुख्याने त्यामध्ये मांडण्यात आला होता. महिलांची होणारी कुचंबणा रोखण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत. नागरिकांमध्येही जनजागृती होणे आवश्यक आहे. स्वच्छतागृहे ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली, तरी स्वच्छतागृहांचा वापर कसा व्हायला हवा, याबाबत नागरिकांमध्ये स्वयंशिस्त हवी. जोपर्यंत नागरिकांमध्ये जनजागृती होणार नाही, तोपर्यंत शहराचा स्वच्छतागृहांचा प्रश्न ऐरणीवर राहणार आहे. भविष्यात नागरिकांना स्वच्छतागृहांबाबत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. स्वत:च्या घरात ज्याप्रमाणे नागरिक स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतात, तशी जाणीव या सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी असायला हवी, असे महापालिकेचे आरोग्य अधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी सांगितले.
स्वच्छतागृहे अपुरी व अस्वच्छ आहेत, अशी कायम ओरड होत आहे. यावर तोडगा काय?
स्वच्छतागृहांचा गतवर्षीचा निविदांचा कालावधी लवकरच संपत आहे. नवीन निविदेचे काम हाती घेतले आहे. क्षेत्रीयस्तरावर सध्या काम सुरू आहे. स्वच्छतागृहे आता यांत्रिक पद्धतीने साफ करण्याचा आमचा प्रस्ताव आहे. यासाठी मलजेट हे उपकरण वापरून स्वच्छतागृहांची साफसफाई ठेवली जाणार आहे.
सार्वजनिक स्वच्छतागृहांतील दुर्गंधी थांबविण्यासाठी काय उपाययोजना करणार आहात ?
सार्वजनिक स्वच्छतागृहे साफ ठेवणे जितके कर्मचाऱ्यांचे आद्य कर्तव्य आहे, तितकेच झोपडपट्टी निवासधारकांचेदेखील आहे. या भागातील नागरिक स्वच्छतागृहे खूप घाण करतात. सर्व झोपडपट्टी भागात अशीच परिस्थिती आहे. सर्व ठिकाणी ड्रेनेज पाइपलाइन आहे. काही ठिकाणची ड्रेनेज या घाणीमुळेच तुंबलेली असतात. त्यावर सेफ्टी टँक पर्याय आहे. मात्र, शहरात पूर्णपणे ड्रेनेज पाइपलाइन आहे.
महिला स्वच्छतागृहांची कमतरता आहे का?
पुरुषांच्या तुलनेत महिला स्वच्छतागृहांची कमतरता नाही. महिला स्वच्छतागृहांची संख्या पुरुषांच्या स्वच्छतागृहांएवढीच आहे. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत ती अपुरी आहेत. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहांचा प्रस्ताव आहे. मात्र, जागेचा खूप मोठा प्रश्न आहे. यामुळे काही ठिकाणच्या स्वच्छतागृहांचे काम रखडलेले आहे.
जनजागृती करण्यात येते का? स्वच्छतागृहांबाबत कायमच जनजागृतीचे काम सुरू असते. एप्रिल महिन्यातच स्वच्छतागृहांचा पंधरवडा राबविण्यात आला. त्यामध्ये ठिकठिकाणी फलक लावून जनजागृती करण्यात आली. यापुढे उघड्यावर स्वच्छतागृहास बसणाऱ्यांना दंड ठोठावला जाणार आहे. आता कारवाई करणे आवश्यक आहे.