सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 02:01 AM2018-08-21T02:01:31+5:302018-08-21T02:01:53+5:30

मंडप, देखावे साकारण्यासाठी कार्यकर्त्यांचे नियोजन सुरू, सामाजिक आणि पौराणिक देखाव्यांवर राहणार भर

Public meetings of public Ganeshotsav | सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची लगबग

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची लगबग

googlenewsNext

पिंपरी : श्री गणरायाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले असून, पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची लगबग सुरू झाली आहे. मंडप उभारणीसह देखाव्यांसाठी कार्यकर्त्यांचे जोरदार नियोजन सुरू आहे.
गणरायाचे आगमन म्हणजे सर्वांसाठी आनंदाची पर्वणीच असते. घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडूनही जोरदार नियोजन सुरू आहे. पिंपरी-चिंचवड शहरात छोटी-मोठी अनेक मंडळे आहेत. यापैकी अनेक मंडळांकडून दरवर्षी सामाजिक, पौराणिक, प्रबोधनात्मक देखावे सादर केले जात असतात. हे देखावे साकारण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. यंदा देखाव्याचा कोणता विषय असावा, पौराणिक असावा की प्रबोधनात्मक असावा तसेच देखावा हलता असावा की जिवंत असावा यावर कार्यकर्त्यांचे नियोजन सुरू आहे. तर अनेक मंडळांनी देखावे फायनल करून पुढील कामकाज सुरू केले आहे.
हलत्या देखाव्यांसाठी मूर्ती बनविण्याचे काम सुरू आहे. मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून मूर्तींची पाहणी केली जात असून, आवश्यक ते बदल सूचविले जात आहेत. यासह जिवंत देखाव्यांसाठी चांगले विषय घेतले जात असून, मंडळातील कार्यकर्ते या देखाव्यांमध्ये काम करण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहेत. देखाव्याची ध्वनिफीत तयार करण्यासाठी देण्यात आल्या असून, ध्वनिफीत मिळाल्यानंतर गणेशोत्सवाच्या काही दिवस अगोदर देखाव्याच्या सरावाला सुरुवात होणार असल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवासाठी मंडप, विद्युत रोषणाई, मिरवणुकीसाठी ट्रॅक्टर, जनरेटर, साऊंड सिस्टीम, ढोल-ताशा पथक आदींची आवश्यकता असते. मात्र, गणेशोत्सवात या सर्वच गोष्टींना मोठी मागणी असल्याने ऐनवेळी त्या उपलब्ध होत नाही. त्यामुळे धावपळ होते. यासाठी मंडळांनी आताच अ‍ॅडव्हान्स देत या वस्तू बुक केल्या आहेत. तसेच विविध परवान्यांसाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू आहे. नियोजन सुरू असल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

कला जोपासत केली बेरोजगारीवर मात
मोशी : शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याची ओरड तरुणांकडून केली जाते. कौशल्य विकसित करण्यासाठी किंवा वेगळा मार्ग चोखाळण्याचे धाडस किंवा मिळेल ते काम करण्याची मोजक्याच काही जणांची तयारी असते. अशाच धडपड्या तरुणांपैकी एक असलेल्या राणाजी राठोड या तरुणाने मूर्तीला आकार देताना आपले आयुष्य साकारले आहे.
मूळचा राजस्थानातील असलेला राठोड मोशी येथे गणेश मूर्ती बनविण्याचे काम करतो. घरची परिस्थिीती बेताची असल्याने शिक्षण घेता आले नाही. अशाही परिस्थितीत राठोड याने आपल्या अंगी कला जोपासली. त्या जोरावर राठोड आता यशस्वी मूर्तीकार झाला आहे.
राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील हा उमदा पण अशिक्षित तरुण वयाच्या विसाव्या वर्षी आपले गाव, जिल्हाच नव्हे तर राज्य सोडून महाराष्ट्रात आला. पंचवीस वर्षांपासून गणेश मूर्ती व मातीपासून तयार केलेल्या इतर वस्तूंच्या विक्रीचा व्यवसाय राठोड करीत आहेत. गणेशोत्सवादरम्यान सात ते आठ लाख रुपये या व्यवसातून त्यांना मिळतात. यात ४० टक्के नफा मिळतो.
पुणे परिसरात झोपडीत राहून उदरनिवार्हाचे साधन शोधताना राठोड यांची मोठी कसरत झाली. शिक्षण झाले नसल्याने कोणतीही कागदपत्रे नाहीत. त्यामुळे नोकरी मिळणे दुरापास्त झाले. मात्र मूर्ती बनविण्याचा त्यांना छंद होता. याच कलेला जोपासण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यानुसार मूर्ती तयार करायला सुरुवात केली. त्यात यश आले. मूर्तीसह मातीच्या इतर वस्तूही तयार करतो त्यालाही चांगली मागणी असल्याचे राठोड यांनी सांगितले.
व्यवसायात जम बसविल्यानंतर आपले राजस्थानातील कुटुंबीयांनाही मोशीत आणले. त्या सर्वांनीही या व्यवसायात सहभाग घेत हातभार लावला. पुणे-नाशिक महामार्गालगत मोशी परिसरात खासगी जागा भाडेतत्त्वावर घेतली. तेथे मूर्ती कारखाना सुरू केला आहे, असे राठोड यांनी सांगितले. राठोड यांच्या कारखान्यात सध्या पंधरा कारागीर काम करत आहेत. या कारखान्यातून दोन ते अडीच हजार मूर्ती बनविल्या जातात. यंदा दोन हजार मूर्ती विक्रीसाठी तयार आहेत. एक फुटापासून दहा फुटापर्यंत उंचीच्या मूर्ती विक्रीस उपलब्ध आहेत. यंदाच्या मूर्तीच्या किमतीमध्ये दहा ते वीस टक्के वाढ झाली आहे.

ढोल-ताशा पथकांचा कसून सराव
मंडळांकडून गणपतीची प्रतिष्ठापना व विसर्जनाला मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत ढोल-ताशा पथकाचा समावेश असतो. यामुळे ढोल-ताशा पथकांनाही ठिकठिकाणच्या मंडळांकडून निमंत्रण असते. त्यामुळे या पथकांकडून सध्या जोरदार वादनाचा सराव सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.

कार्यकर्त्यांना कामांचे वाटप
गणेशोत्सव सुरू होण्यासाठी कमी दिवस राहिले आहेत. त्यामुळे मंडळांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन उत्सवाचे नियोजन सुरूही केले आहे. कार्यकर्त्यांच्या सूचना लक्षात घेऊन त्यादृष्टीने काही बदलही करण्यात आले आहेत. परवाने काढणे, प्रतिष्ठापणेसह दहा दिवसांचे नियोजन पाहणे आदी कामांचे वाटप सुरू आहे.

Web Title: Public meetings of public Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.