उद्योगनगरीतील सार्वजनिक स्वच्छतागृहे ‘गुगल’वर, हगणदरीमुक्त शहर करण्यावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:42 AM2017-11-20T00:42:15+5:302017-11-20T00:42:47+5:30
पिंपरी : स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर स्वच्छतेचा ध्यास घेतला आहे. हगणदरी मुक्त शहराचा प्रयत्न सुरू आहे.
पिंपरी : स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर स्वच्छतेचा ध्यास घेतला आहे. हगणदरी मुक्त शहराचा प्रयत्न सुरू आहे. महापालिकेने आणखी एक हायटेक पाऊल उचलले असून, महापालिकेने शहरातील ५३५ स्वच्छतागृहांचे गुगल मॅपिंग केले आहे. त्यामुळे नागरिकांना एका क्लिकवर शहरातील त्यांच्या परिसरातील स्वच्छतागृह दिसणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेला स्वच्छ भारत अभियानात नववा क्रमांक मिळाला आहे. हे गुणांकन अधिक वाढावे, यासाठी सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाने प्रयत्न सुरू केलेले आहेत. केंद्र शासनाचे शहर विकास मंत्रालयाने देशातील निवडक शहरांमध्ये सार्वजनिक व सामुदायिक स्वच्छतागृहे यामध्ये पेट्रोल पंप, मॉल, दवाखाने, रेल्वे स्टेशन, बस स्टँड यांची ठिकाणे दर्शविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यानुसार गुगल मॅप वर जाऊन स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहे असे टाईप केल्यानंतर जवळील सर्व सार्वजनिक शौचालये दिसणार आहेत.
या सुविधेमुळे बाहेरून शहरात येणाºया नागरिकांना जवळची स्वच्छतागृहे शोधण्यास मदत होणार आहे. शहरातील सार्वजनिक व सामुदायिक स्वच्छतागृहे असलेला वॉर्ड क्रमांक, स्वच्छतागृहांचा प्रकार, स्वच्छतागृहांची मालकी, पत्ता, वेळ, स्वच्छतागृह वापर मोफत आहे किंवा त्याचे शुल्क आकारले जाणार आहे. स्वच्छतागृह महिला, पुरुष अथवा दोन्ही वापरू शकतात, स्वच्छतागृहाचा बाहेरील व आतिल फोटो आदी माहिती यामध्ये संकलित केली आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये शहरामधील सामुदायिक व सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती गोळा करून गुगल मॅपिंगला गुणांक देण्यात येणार आहे. महापालिकेच्या या सुविधेचा नागरिकांनीही लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
>स्वच्छतागृहे
उभारणीवर भर
शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव आहे. तसेच पुणे-मुंबई महामार्ग किंवा अंतर्गत रस्त्यावर स्वच्छतागृहांचा अभाव होता. महिलांसाठीही स्वच्छतागृहे नसल्याने गैरसोय होत होती. महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर खासगी संस्थांच्या, कंपन्यांच्या मदतीने स्वच्छातागृह उभारणीवर भर दिला आहे.