पीयुसी चाचणीच ‘प्रदूषित’
By admin | Published: March 9, 2015 12:49 AM2015-03-09T00:49:18+5:302015-03-09T00:49:18+5:30
वाहनांद्वारे होणाऱ्या प्रदूषणाची चाचणी करणारी ‘पीयूसी’ (पोल्युशन अंडर कंट्रोल) केंद्रेच ‘प्रदूषित’ झाली आहेत.शहरातील वेगवेगळ्या चार पीयूसी केंद्रांवर
राजानंद मोरे, पुणे
वाहनांद्वारे होणाऱ्या प्रदूषणाची चाचणी करणारी ‘पीयूसी’ (पोल्युशन अंडर कंट्रोल) केंद्रेच ‘प्रदूषित’ झाली आहेत.शहरातील वेगवेगळ्या चार पीयूसी केंद्रांवर अर्ध्या तासात एकाच दुचाकीची प्रदूषण चाचणी केली असता, कार्बन मोनोआॅक्साइड आणि हायड्रो कार्बनच्या प्रमाणात तफावत आढळून आली; तसेच एका केंद्रावर पीयूसी मशिनमधील रीडिंग न पाहताच प्रमाणपत्रावर नोंद करण्यात आली. एका केंद्रावर तर तीनचाकी व चारचाकींसाठी दिले जाणारे पीयूसी प्रमाणपत्र- दुचाकीसाठी देण्यात आले. त्यामुळे प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी परवाने दिलेली ही केंद्रेच प्रदूषणास हातभार लावत असल्याचे चित्र आहे.
वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे वातावरणातील प्रदूषण वाढत चालले आहे. या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने २५० पेक्षा जास्त पीयूसी केंद्रांना परवाने दिले आहेत. दर सहा महिन्याला सर्व वाहनांना पीयूसी चाचणी करणे बंधनकारक आहे. वाहनांद्वारे होणारे प्रदूषण नियंत्रणात आहे किंवा नाही, यासाठी ही चाचणी केली जाते. त्यामध्ये कार्बन मोनोआॅक्साइड व हायड्रोकार्बन या विषारी वायूंचे प्रमाण तपासले जाते. त्यासाठी परिवहन कार्यालयामार्फत परवाने देण्यात आलेली पीयूसी केंद्रे शहरात ठिकठिकाणी अशाप्रकारची चाचणी करतात. मात्र, या चाचणीबाबत केंद्रचालकांनाच गांभीर्य नसल्याचे समोर आले आहे. याबाबत ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने शहरातील विविध ठिकाणच्या चार पीयूसी केंद्रांवर जाऊन दुचाकीची प्रदूषण चाचणी केली. साधारणत: अर्ध्या तासात ही चाचणी करण्यात आली. पण, चारही ठिकाणचे दोन्ही वायूंचे प्रमाण वेगवेगळे आले.
सिंहगड रस्त्यावरील शेजारी-शेजारी असलेल्या दोन पेट्रोलपंपांवरील पीयूसी केंद्रांवर सुरुवातीला प्रदूषण चाचणी करण्यात आली. साधारण ५० मीटरही अंतर नसलेल्या या केंद्रांवर दोन्ही वायूंच्या प्रमाणात तफावत आढळून आली. पहिल्या पंपावर कार्बन मोनोआॅक्साइडचे प्रमाण ०.२ टक्के आले, तर दुसऱ्या केंद्रावर हे प्रमाण ०.३ टक्क्यांनी वाढले. हायड्रोकार्बनच्या प्रमाणातही दुसऱ्या केंद्रावर १८० पीपीएमची वाढ झाली. नवी पेठेतील तिसऱ्या केंद्रावर दोन्ही वायूंच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे आढळून आले.